बाहेरगावी ये-जा करणाऱ्यांना आठ दिवस क्वारण्टाईन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 18:46 IST2020-07-01T18:45:28+5:302020-07-01T18:46:10+5:30
सिन्नर: तालुक्यातील काही लोक भाजीपाला व धान्य व्यापार व्यवसायासाठी मुंबई तसेच इतर शहरामध्ये ये-जा करत असल्याने तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बाहेरगांवाहून येणा-यांची तपासणी करुन त्यांना ८ दिवस विलगीकरण कक्षात ठेवावे, त्यांची इम्युनिटी पॉवर कशी वाढविता येईल याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी अशा लोकांचे समुपदेशन करावे अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केल्या.

बाहेरगावी ये-जा करणाऱ्यांना आठ दिवस क्वारण्टाईन करा
सिन्नर: तालुक्यातील काही लोक भाजीपाला व धान्य व्यापार व्यवसायासाठी मुंबई तसेच इतर शहरामध्ये ये-जा करत असल्याने तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बाहेरगांवाहून येणा-यांची तपासणी करुन त्यांना ८ दिवस विलगीकरण कक्षात ठेवावे, त्यांची इम्युनिटी पॉवर कशी वाढविता येईल याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी अशा लोकांचे समुपदेशन करावे अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केल्या.
येथील नगरपालिका सभागृहात मंगळवारी(दि.३०) दुपारी ३ वाजता कोविङ संबंधात उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. बैठकीस जि.प.चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे, प्रांताधिकारी अर्चना पाठारे, गटविकास अधिकारी लता गायकवाड, तहसिलदार राहुल कोताडे, मुख्याधिकारी संजय केदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, सिन्नर ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. बी. रासेडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार, वैद्यकीय अधिक्षक डॉ. निर्मला गायकवाड, गटशिक्षणाधिकारी मंजुषा साळुंके आदी उपस्थित होते.
बनसोड म्हणाल्या, सिन्नर तालुक्यात २ औद्योगिक वसाहती असून त्यामध्ये बाहेरुन येणा-या कर्मचा-यांची संख्या जास्त असल्याने त्यांचे स्क्रिनिंग करावे. लेबर कॉन्ट्रॅक्टर यांच्यामार्फत कंत्राटी कामगारांची नेमणूक करताना त्यांची कोरोना प्रादूर्भावाच्या दृष्टीने तपासणी होणे आवश्यक आहे. याबाबत संबंधित एमआयडीसीला सुचना देण्यात याव्यात. तालुक्यात शासकीय वैद्यकीय अधिकारी यांची संख्या कमी असल्याने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील व ग्रामीण भागातील सर्व खासागी डॉक्टरांची मदत घ्यावी लागेल. त्यासाठी त्या सर्वाची यादी तयार करुन व्ही.सी.व्दारे मिटींग घेऊन अवगत करण्यात यावे. जेणेकरुन सर्वांना प्रभावी अंमलबजावणी कामी मार्गदर्शक सुचना देण्यात येतील.
तसेच सिन्नर ग्रामीण रुग्णालयात पॅथालॉजी लॅब सुरु करण्या बाबत वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार झालेला असल्याचे सांगत रक्त नमुने व इतर तपासण्या लवकरच सुरु करण्यात येतील अशी ग्वाही बनसोड यांनी दिली.
यावेळी पंचायत समिती सिन्नर सभागृहात नगरपालिकेच्या क्षेत्रातील सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचा-यांशी संवाद साधून कोरोना सर्वेक्षण करण्यासाठी बनसोड यांनी मार्गदर्शन केले.