गुणवत्तेशी तडजोड नको

By Admin | Updated: January 21, 2016 22:29 IST2016-01-21T22:28:19+5:302016-01-21T22:29:26+5:30

अनिलकुमार लांडगे : आदर्श अभियंता पुरस्कार वितरण

Quality does not compromise | गुणवत्तेशी तडजोड नको

गुणवत्तेशी तडजोड नको

नाशिक : ज्याप्रमाणे सीमेवरील सैनिक आपल्या प्राणांची आहुती लावून देशवासीयांना सुरक्षित ठेवण्याचे काम करतात. त्याचप्रमाणे अभियंत्यांनीही सर्व सामान्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देताना कोणत्याही प्रकारे गुणवत्तेशी तडजोड करू नये, असे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार लांडगे यांनी केले.
जिल्हा परिषद व अभियंता संघटनेच्या वतीने काल (दि.२१) जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आदर्श अभियंता पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून लांडगे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून देवळाली कॅम्पचे प्रशासकीय कमाडंट कर्नल श्रीकांत दीक्षित, कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे, अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील उपस्थित होते. याप्रसंगी आदर्श अभियंता म्हणून लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र (आप्पा)गंगावणे, आर.पी. सूर्यवंशी, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता मधुकर लांबे, केशव उशीर, एन. आर. पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना अनिलकुमार लांडगे यांनी सांगितले की, सर विश्वसरय्या यांच्याकडून प्रेरणा घेऊन अभियंत्यांनी कामकाज करावे. प्रत्येक व्यक्ती माणूस म्हणून सुरक्षित राहण्यासाठी सीमेवर जसे सैन्य लढत असते. तसेच नागरिकांना भौतिक सुखसुविधा उपलब्ध करून देताना गुणवत्तेशी अजिबात तडजोड करता कामा नये. नाहीतर दुर्घटना घडतात. कर्नल श्रीकांत दीक्षित यांनी सांगितले की, सैनिकी क्षेत्राला करिअर म्हणून निवडले पाहिजे. या क्षेत्राबाबत भीती बाळगता कामा नये. आपण ३२ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक मोहिमेत सहभाग घेतला. त्यात संसदेवर अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर त्यांना पिटाळून लावण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी अभियंता संघटनेचे सर्व पदाधिकारी व जिल्हा परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Quality does not compromise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.