प्यार पे पेहरा

By Admin | Updated: February 15, 2016 00:07 IST2016-02-14T23:53:36+5:302016-02-15T00:07:23+5:30

दुचाकींवर कारवाई : ५० अधिकाऱ्यांसह ५०० कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त

Pyaar Pe Pehara | प्यार पे पेहरा

प्यार पे पेहरा

नाशिक : ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांनी शहरातील कॉलेजरोड, पर्यटनस्थळे तसेच गर्दीच्या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात केला होता़ दरम्यान, भरधाव वेगाने दुचाकी चालविणारे, कागदपत्रे न बाळगणारे, फॅन्सी नंबर प्लेटच्या दुचाकीधारक युवकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे़
‘व्हॅलेंटाइन डे’ला होणारा राजकीय विरोध मावळला असला तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तांनी कडक बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार शहराजवळील पर्यटनस्थळे, महाविद्यालये, कॉलेजरोड या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ रविवार सुटीचा दिवस असूनही तरुणाई कॉलेजरोडवर मोठ्या संख्येने एकत्र आली होती़ यात बहुतांशी प्रेमीयुगुलांनी एकांत व निर्जनस्थळी जाऊन ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला़
पर्यटनस्थळे वा निर्जन ठिकाणी जाणाऱ्या प्रेमीयुगुलांना एकटे गाठून मारहाण, लूट तसेच युवतींवर अत्याचाराची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे शहराजवळील सोमेश्वर, गंगापूर डॅम, आनंदवली, नवश्या गणपती, पांडवलेणी, काश्यपी धरण, बालाजी मंदिर, फाळके स्मारक या परिसरात विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ तरुणाईच्या अतिउत्साहामुळे अप्रिय घटना घडू नये यासाठी हा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ ‘व्हॅलेंटाइन डे’च्या बंदोबस्तासाठी शहर पोलीस आयुक्तालयातील दोन पोलीस उपआयुक्त, चार सहायक पोलीस आयुक्त, अकरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ३३ पोलीस अधिकारी, ५१२ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Pyaar Pe Pehara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.