पुष्य, पूर्वा, उत्तरा, हस्त; पाऊस झाला मस्त...!

By Admin | Updated: October 5, 2015 22:58 IST2015-10-05T22:58:21+5:302015-10-05T22:58:58+5:30

मान्सूनचा परतीचा प्रवास : पुनर्वसू, आश्लेषा, मघा नक्षत्र कोरडे; हस्त नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात पावसाचे भाकीत

Pushy, Purusha, Uttara, Hands; It was raining ...! | पुष्य, पूर्वा, उत्तरा, हस्त; पाऊस झाला मस्त...!

पुष्य, पूर्वा, उत्तरा, हस्त; पाऊस झाला मस्त...!

नाशिक : यावर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी बरसलेल्या पावसाने मान्सूनच्या दमदार आगमनाची वर्दी दिली खरी; परंतु गेल्या चार महिन्यांत अवघे २३ दिवस पावसाचे असून पुष्य, पूर्वा, उत्तरा आणि हस्त नक्षत्राने आधार दिल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा होऊ शकला आहे. मान्सून आता परतीच्या प्रवासाला लागलेला असतानाच वेधशाळेसह पंचांगकर्त्यांनीही हस्त नक्षत्रातील तिसऱ्या चरणात चांगल्या पावसाचे भाकीत वर्तविले आहेत.
यावर्षी सरासरीपेक्षा कमीच पर्जन्यमान राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला होता. पंचांगकर्त्यांनीही मान्सून वेळेत, पण सरासरी गाठणारे पर्जन्यमान राहणार असल्याचे भाकीत वर्तविले होते. याशिवाय, पंचांगकर्त्यांनी पहिल्या दोन्ही नक्षत्रांत समाधानकारक पाऊस न होता त्याचा सर्वाधिक जोर जुलै-आॅगस्टमध्ये राहण्याचा आणि उत्तरार्धातील नक्षत्रात पाऊसमान मंदावणार असल्याचे म्हटले होते. गेल्या चार महिन्यांतील पावसाचा आढावा घेतला, तर शहर व जिल्ह्यात २३ दिवस पावसाचे होते. त्यातील मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला पावसाने हजेरी लावत आपल्या आगमनाची वर्दी दिली आणि नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी बरसत दिलासा दिला. त्यानंतर मृग नक्षत्रात वातावरण ढगाळ राहिले; परंतु सरी काही कोसळल्या नाहीत. मृगाच्या अंतिम चरणात २१ जूनला पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि आर्द्रा नक्षत्रातील पहिल्या चरणात शहर व जिल्ह्यात दमदार पावसाची नोंद झाली. आर्द्राच्या पहिल्या तीन दिवसांतच झालेल्या बॅटिंगने जिल्ह्यातील टॅँकर्सची संख्याही जिल्हा प्रशासनाला घटवावी लागली. त्यानंतर मात्र, ८ जुलैला पावसाच्या किरकोळ सरी वगळता पुनर्वसू नक्षत्र पूर्णत: कोरडे गेले. पावसाने ओढ दिलेली असतानाच पुष्य नक्षत्राने मात्र दिलासा दिला. पुष्य नक्षत्रात २० ते २२, २६ आणि २७, २९ जुलैला पावसाचे दमदार पुनरागमन झाले. संततधार पावसाने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. त्यानंतर आश्लेषा व मघा नक्षत्रातही समाधानकारक पाऊस झाला नाही. पूर्वा नक्षत्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार सलामी दिली. ९, १० सप्टेंबरला दमदार हजेरी लावली, तर पूर्वा नक्षत्राच्या अंतिम चरणात १२ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास अचानक अंधारून येत पावसाने धुवाधार बॅटिंग केली. उत्तरा नक्षत्रातही १८, २० आणि २३ सप्टेंबरला संततधार पावसाने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली. आता २७ सप्टेंबरपासून हस्त नक्षत्र सुरू असून, २ आणि ३ आॅक्टोबरला वीज-वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसाने जिल्ह्यात दोन बळी घेतले आहेत. पुण्यातील वेधशाळा आणि पंचांगकर्त्यांनीही हस्त नक्षत्रातील दि. ५ ते ८ या कालावधीत चांगल्या पावसाचे अंदाज वर्तविले आहेत. पावसाच्या नऊ नक्षत्रांपैकी हस्त हे आता शेवटचे नक्षत्र असून, ११ आॅक्टोबरनंतर चित्रा नक्षत्रास प्रारंभ होणार आहे. चित्रा आणि स्वाती ही पावसाची नक्षत्रे मानली जात नसली तरी, या गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता या दोन्ही नक्षत्रांत अवकाळी पावसाचीही शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Pushy, Purusha, Uttara, Hands; It was raining ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.