पूजेचा पाट वापरणाऱ्या पुरोहितास विश्वस्ताची मारहाण
By Admin | Updated: September 12, 2015 22:53 IST2015-09-12T22:52:27+5:302015-09-12T22:53:14+5:30
पूजेचा पाट वापरणाऱ्या पुरोहितास विश्वस्ताची मारहाण

पूजेचा पाट वापरणाऱ्या पुरोहितास विश्वस्ताची मारहाण
त्र्यंबकेश्वर : येथील त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त व त्रिकाल पूजक सत्यप्रिय शुक्ल यांनी येथील पुरोहित लक्ष्मीकांत थेटे यांना पूजेचा पाट वापरल्याने कोठीत बोलावून देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश यांच्यासमोर बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत थेटे गंभीर जखमी झाले.
दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास उदासीन आखाड्याचे महामंडलेश्वर कार्ष्णिगुरू शरणानंद हे त्र्यंबकेश्वर मंदिरात आले होते. स्वामीजींचे पुरोहित म्हणून लक्ष्मीकांत थेटे यांनी त्यांना पूजेला बसण्यासाठी त्रिकाल पूजक सत्यप्रिय शुक्ल यांचा पाट दिला. यावरून शुक्ल यांनी थेटेंंना कोठीत बोलवून जाब विचारला. यावेळी थेटेंनी माफीही मागितली. मात्र त्याने शुक्ल यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे झालेल्या बाचाबाचीनंतर शुक्ल यांनी लक्ष्मीकांत थेटे यांना जबर मारहाण केली. यात थेटे जबर जखमी झाले असून, त्यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लक्ष्मीकांत थेटे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात सत्यप्रिय शुक्ल यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहार)
तरुणाचा मृत्यू
मालेगाव : तालुक्यातील पाटणे शिवारात शेतातील विद्युत मोटारीच्या वायर जोडत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने जबर धक्का लागल्याने ज्ञानेश्वर शिवाजी अहिरे (३८) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी तुकाराम देवचंद बागुल (४८) या शेतकऱ्याने तालुंका पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)