हा तर संस्कृती रक्षकांचा शुद्धिकरण महायज्ञ
By Admin | Updated: August 23, 2016 00:15 IST2016-08-23T00:15:26+5:302016-08-23T00:15:58+5:30
हा तर संस्कृती रक्षकांचा शुद्धिकरण महायज्ञ

हा तर संस्कृती रक्षकांचा शुद्धिकरण महायज्ञ
!हेमंत कुलकर्णी ल्ल नाशिक
पुरेसे ज्ञान नाही. साधी माहितीही नाही. हिन्दुस्तानातील संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी अवतारित झालेल्या संघाच्या मुशीतून घडलेल्या (मोहन भागवत भले काहीही म्हणोत) भाजपाची ध्येयधोरणे ठाऊक नाहीत, मुळात हिन्दू संस्कृती कशाशी खातात याचे भान नाही. त्यामुळे या संस्कृतीची व्यवच्छेदक लक्षणे कोणती याचा अभ्यास नाही. आणि चालले मोठे भाजपाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायला! काय तर म्हणे भाजपाने सोवळे सोडून ठेवले पण ओवळे सापडत नाही. किती ही हीन पातळीवर जाऊन केलेली टीका!
ज्यास थारा नाही, निवारा नाही, कोणाचा आश्रय-सहारा नाही त्याला उराशी कवटाळणे ही तर खरी हिन्दू संस्कृती! एखादा वृक्ष किंवा साधे झाड जरी पडले तरी त्या झाडावर वस्ती करुन असलेली आणि त्या झाडाच्याच आधारे आपली क्षुधाशांती आणि तृष्णाशांती करणारी पाखरे सैरभैर होतात. सैरावैरा सहारा शोधत फिरु लागतात. येथे तर साधे एकादे झाड किंवा वृक्ष नव्हे तर अवघा ‘फार्म’च उन्मळून पडला आहे. त्या फार्मच्या जोरावर आणि भरवशावर जे त्या गजाननागत तुंदीलतनू झाले त्यांच्या उदरभरणाची सोय करणे ही तर साधी भूतदया. ती दाखविली तर कोण तो गहजब. त्यातून ज्यांचेवर ती सहानुभूती दाखवायची ते का कायमचे वस्तीला येऊन राहाणार आहेत? आज भाजपाचे झाड कैऱ्यांनी वा चिंचेनी लदलदले आहे. उद्या त्यांचीदेखील फार्मसारखी बाभळ झाली तर कोण येणार आहे अंगाला काटे टोचवून घ्यायला?
प्रभू रामचन्द्राच्या भव्य मंदिरासाठी प्राणार्पण करण्यासाठी सदैव दक्ष राहाणाऱ्यांचा हा पक्ष रामाइतकाच रामदूत हनुमंताचादेखील परमभक्त. याच हनुमंताला पवनसूत म्हणजे पवनाचा म्हणजे वाऱ्याचा पुत्र म्हणूनही सारे जग ओळखते. मग ज्या पवनपुत्राच्या ठायी सारी भक्ती एकवटते त्याच्या पित्याचे नाव धारण करणाऱ्यास चार विरोधी टाळकी विरोध करतात वा विरोध करतील म्हणून का भाजपानेही असेच वाऱ्यावर सोडून द्यायचे असते? तसे करणे म्हणजे पापाचरण. शरण आलेल्याला मरण द्यायचे नसते, त्याला शरण देऊन पोटाशी घ्यायचे असते हे साधे संस्कृतीरक्षक तत्त्व ज्यांना मान्य नाही त्यांची टीका मग भाजपाने तरी का मान्य करावी?
पवन म्हणजे झंझावात. हा झंझावात जेव्हां ज्याची योग्यता दहा पाच हजारांचे नायकत्व पत्करण्याचीही नसते त्याला थेट पाच-सहा लक्ष लोकांचे नायकत्व मिळवून देतो तेव्हां त्याने केलेल्या या थोर उपकाराचे स्मरण ठेवून त्याच्या भाळी केशरी टिळा लावणे यात कोणते आले आहे पाप? शेवटी भाजपाची संस्कृती सांगते तेच खरे. पाप नेहमी बघणाऱ्याच्या नजरेत असते!
भाजपाची हिन्दु संस्कृती म्हणजे वीरस्मरण करण्याची. वीरांचा यथोचित गौरव करण्याची. त्यांना त्यांचे उचित स्थान मिळवून देण्याची. वर्दीतल्या सरकारी मुलाजिमाला साधे मारणे तर सोडाच पण जीवे मारणे हे का कोणा येरागबाळ्याचे काम? तेथे शौर्य हवे, धाडस हवे, बळ हवे, अंगी विरश्री हवी, आणि निधडी छाती हवी. जो महापुरुष या पंचगुणांचा स्वामी आहे त्याच्या गुणांचा यथोचित आदर करणे याला लागणारी गुणग्राहकता हे तर भाजपाच्या संस्कृतीचे महत्वाचे व्यवच्छेदक लक्षण.
इतके दिवस वयं पंचाधिकं शतं हे तत्त्व पाळले गेले. हिन्दु संस्कृतीच्या रक्षणाचे आणि मराठी मनाच्या पोषणाचे काम त्या शतमवाल्यांकडे सुपूर्द करुन ठेवले होते. त्यात एक सोयदेखील होती. पण आता वयं पंचाधिकं शतं नव्हे तर शत प्रतिशत अहं! काम सोपे नाही, पण अशक्यदेखील नाही. अशक्य ते शक्य करुन दाखवायचे तर दारी आलेल्या याचकाला त्याचा धर्म, त्याचे कर्म आणि त्याचे मर्म विचारायचे नसते. त्याला सरळ पोटाशी घ्यायचे असते. कारण हे कार्य साधेसुधे नाही. तो एक संस्कृतीरक्षणाचा आणि शुद्धिकरणाचा महायज्ञ आहे.
मागे कोण कायसे म्हणत होते की, आम्ही अंगा-खांद्यावर समाजातील साप-विंचू-नाग (ज्यांच्यासाठी अलीकडे समाजकंटक असा अत्यंत अभद्र शब्दप्रयोग वापरला जातो) बाळगतो आणि सोयीनुसार त्यांच्या सेवादेखील घेतो, हा राजकीय पक्षांच्या दृष्टीने मोठा अभिमानाचा विषय असतो.
याला भाजपाने अपवाद ठरावे, असे तर टीकाकारांना म्हणायचे नाही? खुशाल म्हणोत, पण आता कोण त्यांची पर्वा करतो? पण या टीकाकारांनी एक बाब नीट समजून घेणे अंती त्यांच्याच हिताचे. भाजपावाले भले असतील नावापुरते का होईना साव, पण त्यांनी जे साप-नाग-विंचू अंगावर धारण केले आहेत ते केवळ हौस म्हणून किंवा नागपंचमीचा खेळ करता यावा म्हणून नव्हे!