जिल्हा परिषदेची खरेदी अडकली ‘दर’ करारात
By Admin | Updated: December 1, 2015 22:45 IST2015-12-01T22:44:16+5:302015-12-01T22:45:29+5:30
झेरॉक्स मशीन, सायकल, सौर पथदीप, ताडपत्रींची लाभार्थ्यांना प्रतीक्षाच

जिल्हा परिषदेची खरेदी अडकली ‘दर’ करारात
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत सीसीटीव्ही आणि तिजोरी खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली असतानाच आता जिल्हा परिषदेतही कृषी व समाज कल्याण विभागाच्या साहित्य खरेदी अशाच वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या खरेदी मुहूर्त सापडत नसून दरकरार आणि ई-निविदेच्या चक्रव्यूहात लाभार्थी मात्र हे साहित्य मिळण्यापासून वंचित राहिल्याचे चित्र आहे.
मंगळवारी (दि.१) झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा झाली. सदस्य बाळासाहेब गुंड, प्रा. अनिल पाटील व शिवसेना गटनेते प्रवीण जाधव यांनी या विषयाच्या चर्चेला तोंड फोडले.
गुंड यांनी गेल्या वर्षाभरापासून समाजकल्याण विभागाची झेरॉक्स मशीन व सायकल खरेदी का रखडली? लाभार्थ्यांना या योजनेतून साहित्याचे का वाटप करण्यात आले नाही, अशी विचारणा केली. प्रवीण जाधव यांनी शासन एकीकडे दरकरार करत असताना दुसरीकहे ई-निविदा कशासाठी असा प्रश्न केला. त्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड यांनी सांगितले की, ५० लाखांच्या पुढील कोणत्याही खरेदीस ई-निविदा बंधनकारक करण्यात आल्याचे सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दरकरार केलेल्या कंपन्यांकडून एक कोटीपर्यंतची खरेदी करता येते, त्यापुढील कोणत्याही खरेदीस ई-निविदा पद्धतीचा अवलंब केला जातो, असे सांगितले. तसेच यावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी. जी. सोनकांबळे यांना याबाबतच्या शासन निर्णयाची माहिती देण्यास
सांगितले.
तत्पूर्वी जिल्हा समाजकल्याण अधिकारी सतीश वळवी यांनी झेरॉक्स मशीनची दोन टप्प्यांत, तर ताडपत्री व सायकलची एका टप्प्यात मिळून एक कोटी ८० लाखांची साहित्य खरेदी करावयाची असून, त्यासाठी ई-निविदा पद्धत अवलंबण्यात येऊन लवकरच खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले.
त्याचवेळी ही खरेदी ई-निविदा की दर करारानुसार करण्यात येईल, अशी विचारणा प्रवीण जाधव यांनी केली. खरेदी पावणे दोन कोटींची असल्याने ती ई-निविदा पद्धतीने करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
(प्रतिनिधी)