पुणे बसेसला सिन्नरच्या प्रवाशांचे वावडे
By Admin | Updated: March 27, 2016 23:30 IST2016-03-27T23:14:03+5:302016-03-27T23:30:43+5:30
वाहकांचा प्रताप : जागा असूनही नाकारले जाते तिकीट

पुणे बसेसला सिन्नरच्या प्रवाशांचे वावडे
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिकहून सुटणाऱ्या पुण्याच्या बसेसमध्ये सिन्नर, संगमनेरपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसू दिले जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
नाशिक येथील नवीन मध्यवर्ती बसस्थानकावरून सुटणाऱ्या पुण्याच्या बसेसमध्ये केवळ वीस ते पंचवीस प्रवासी असतानादेखील सिन्नर किंवा संगमनेरपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये वाहकांकडून प्रवेश दिला जात नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असली तरी दुसरीकडे महामंडळाचेही आर्थिक नुकसान होत
आहे.
दुपारच्या सुमारास नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या बसमधून केवळ जागा नसल्याचे कारण सांगून सिन्नर व संगमनेरच्या प्रवाशांना तिकीट नाकारण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. पुण्यापर्यंत रिकाम्या जाणाऱ्या नाशिकच्या बसेसमध्ये सिन्नर, संगमनेर प्रवाशांना प्रवास करू द्यावा, अशी मागणी वारंवार महामंडळाकडे केली जात असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे. नाशिकहून सिन्नर, संगमनेरकडे जाणाऱ्या पुण्याच्या बसेस तसेच सिन्नर स्थानकावरूनही संगमनेरपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना
पुण्याच्या बसेसमध्ये प्रवेश दिला जावा, वाहकांची मनमानी थांबवावी, अशी मागणी होत
आहे. (प्रतिनिधी)