दुष्काळाच्या सावटात आज पोळा
By Admin | Updated: September 11, 2015 23:39 IST2015-09-11T23:38:38+5:302015-09-11T23:39:49+5:30
दुष्काळाच्या सावटात आज पोळा

दुष्काळाच्या सावटात आज पोळा
नाशिक : शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलांना सन्मान देणारा पोळा हा सण उद्या (दि. १२) साजरा होत असून, यंदा या सणावर दुष्काळाचे सावट आहे. तथापि, माफक प्रमाणात का होईना, बळीराजा हा सण साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे.
शेतकऱ्यांच्या शेतात बैल वर्षभर राबतात, त्यांच्या कष्टांतूनच मळा फुलतो. श्रावण अमावास्येला साजऱ्या होणाऱ्या पोळ्याला या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी शेतकरी बैलांना अंघोळ घालतात, त्यांची सजावट करतात. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी बैलांना शेतीकामापासून पूर्णत: विश्रांती दिली जाते. या सणासाठी शेतकऱ्यांची तयारी आठवडाभर आधीपासूनच सुरू होते. यंदा मात्र पावसाअभावी पोळ्यावर दुष्काळाचे सावट आहे. बैल सजविण्याच्या वस्तूंनी बाजार सजला असला, तरी त्यांची फारशी विक्री झालेली नाही. त्यातच बऱ्याच वस्तूंच्या किमती वाढल्याने शेतकरीवर्गात नाराजी आहे.
रोटरीच्या वतीने बैलपूजन
रोटरी क्लब आॅफ नाशिकच्या वतीने उद्या (दि. १२) दुपारी ३ वाजता बैलपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. औरंगाबाद रोडवरील नांदूर नाका परिसरातील रौंदळ डेअरी, चारी क्र. ६ येथे होणाऱ्या या कार्यक्रमात बैल व घोडे यांचे संमेलनच भरवले जाणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचे रोटरीच्या वतीने विवेक जायखेडकर, करण रौंदळ यांनी कळवले आहे.