सोशल मीडियावर प्रचार, १९० उमेदवारांना परवाना
By Admin | Updated: February 14, 2017 01:19 IST2017-02-14T01:19:16+5:302017-02-14T01:19:35+5:30
व्हॉट्स अॅपला पसंती : १४, २१ मधून सर्वाधिक अर्ज; भ्रमणध्वनीवर प्रचारपत्रकांचा मारा

सोशल मीडियावर प्रचार, १९० उमेदवारांना परवाना
नाशिक : चार सदस्यीय प्रभाग रचना होतानाच प्रभागाची व्याप्तीही वाढल्याने अल्प कालावधीत सर्वच मतदारांपर्यंत जाऊन पोहोचणे उमेदवारांना अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे उमेदवारांकडून प्रचारासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे. सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी महापालिकेकडून आतापर्यंत १९० उमेदवारांना परवाना देण्यात आला असून, त्यात व्हॉट्स अॅपला सर्वाधिक पसंती आहे. दरम्यान, प्रभाग १४ व २१ मधून सर्वाधिक उमेदवारांनी परवाना प्राप्त केले आहेत. महापालिका निवडणुकीत उमेदवारांकडून मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठीवर भर दिला जात असला तरी सर्वच मतदारांपर्यंत जाऊन पोहोचणे कठीण आहे. त्यामुळेच मतदारांपर्यंत आपली उमेदवारी पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे. मात्र, सोशल मीडियावर प्रचार करण्यापूर्वी उमेदवारांसह राजकीय पक्षांना महापालिकेच्या सोशल मीडिया सेलकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. सदर सेलमार्फत सोशल मीडियाच्या कोणत्या माध्यमातून कोणत्या प्रकारचा प्रचार केला जाणार आहे, याची पडताळणी केली जाते. त्यात काही आक्षेपार्ह नसेल तरच परवानगी दिली जात आहे. महापालिकेने आतापर्यंत सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी १९० उमेदवारांना परवानगी दिली आहे. उमेदवारांकडून सोशल मीडियावरील व्हॉट्स अॅपला सर्वाधिक पसंती दिली जात असून, त्याखालोखाल फेसबुक, एसएमएस, ट्विटर आणि ई-मेलचा वापर केला जात आहे. व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून सध्या नागरिकांच्या भ्रमणध्वनीवर उमेदवारांच्या प्रचारपत्रकांचा सारखा मारा होत आहे. याशिवाय, एसएमएसनेही धुमाकूळ घातला असून, रोज कुणा महापुरुषाच्या पुण्यतिथी-जयंतीनिमित्त अभिवादन-आदरांजली वाहून विविध समाज घटकांनाही आपल्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)