लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात वरचा क्रमांक मिळविण्यासाठी आतापासूनच विविध उपाययोजना आखण्याची तयारी सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून शहरातील सार्वजनिक तसेच सुलभ शौचालयांचे सर्वेक्षण करत दुरुस्ती व सुधारणांवर भर दिला जाणार आहे.केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात पाचशे शहरांमधून नाशिकचा १५१ वा क्रमांक आला. नाशिकचा क्रमांक गेल्या वर्षाच्या तुलनेत घसरल्याने महापालिका प्रशासनावर बरीच टीका झाली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक महापालिकेला भेट दिल्यानंतर यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या दहा क्रमांकात येण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यानुसार, महापालिकेने आतापासूनच स्वच्छ सर्वेक्षणाच्या दृष्टीने तयारी आरंभली आहे. शहरात महापालिकेने एकूण ४०७ शौचालये उभारलेली असून, त्यात ८६ सुलभ शौचालये तर १३२ सार्वजनिक शौचालये आहेत. या सर्व शौचालयांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.
सार्वजनिक शौचालयाचे महापालिकेमार्फत सर्वेक्षण
By admin | Updated: June 14, 2017 01:03 IST