सत्ताधाऱ्यांविरूद्ध जनतेचा कौल
By Admin | Updated: February 24, 2017 23:46 IST2017-02-24T23:46:00+5:302017-02-24T23:46:18+5:30
कॉँग्रेस, राष्ट्रवादीला फटका : भाजपाची ताकद वाढली

सत्ताधाऱ्यांविरूद्ध जनतेचा कौल
संजीव धामणे : नांदगाव जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निकाल प्रस्थापितांना हादरा देणारे असले तरी यामागे सत्ताधाऱ्यांविरूद्धचा जो रोष जनतेच्या मनात खदखदत होता, त्याचेच प्रतिबिंब मतदानात दिसून आला आहे. त्यामुळे कॉँग्रेस, राष्ट्रवादीला नाकारत मतदारांनी शिवसेना, भाजपाच्या बाजूने कौल दिला आहे. जिल्हा बँक, बाजार समित्या, दोन पालिका जिंकणाऱ्या शिवसेनेचे पुढचे लक्ष विधानसभा असणार आहे तर भाजपाला या निवडणुकीत संजीवनी मिळाल्याने यापुढे ते ही फॉर्मात असणार आहेत. गटात दोन व गणात पाच जागा मिळवून शिवसेनेचा भगवा झेंडा नांदगाव पंचायत समितीवर पंधरा वर्षांनी फडकला. भाजपाला गटात एक व गणात तीन जागा मिळाल्या. गटात जेमतेम एक जागा मिळविणाऱ्या काँग्रेसला गणात एकही जागा मिळवता आली नाही. राष्ट्रवादीचा पूर्णत: सफाया झाला. त्यांना गट व गण यात एकही जागा मिळाली नाही. न्यायडोंगरी गटाच्या लक्ष्यवेधी लढतीत नातीकडून आजीला पराभव पत्करावा लागला. शिवसेनेचा वारू काँग्रेसने रोखला. या ठिकाणी शिवसेनेच्या मतांमध्ये विभाजन झाले. गटात शिवसेनेला रोखण्यात काँग्रेसला यश मिळाले असले तरी न्यायडोंगरी गणात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाल्याने या यशाला क्रॉस व्होटिंगच्या लोकापवादाची झालर लागली. अनिल अहेरांच्या एकखांबी तंबूला त्यांचे बंधू विलास आहेर यांनी या निवडणुकीत प्रथमच हादरा दिला. दोघांचे नातेसंबंध व बहुतांश कार्यकर्ते सारखेच.. त्यामुळे या सर्वांची यावेळी मोठी फरफट झाली. साकोरे गटात राष्ट्रवादीवर बंडखोरीचे सावट आले. गट व दोन्ही गणात राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले. भुजबळांचे निकटवर्तीयांनी बंडखोरी केल्याने आमदार पंकज भुजबळ यांनी हा गट प्रतिष्ठेचा करून ही, त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. घाटमाथ्यावरचा जातेगाव गट तर केवळ स्वयंप्रेरणेवर लढला. येथील बोलठाण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. जातेगाव गणात भाजपाच्या विजयाचे अप्रूप आहे. गट व शेजारच्या मांडवड गणात शिवसेना उमेदवार विजयी होत असताना याच ठिकाणी झालेला भाजपाचा विजय वेगळ्याच समीकरणांकडे घेऊन जातो. समाज मनाची छुपी मानसिकता हा चिंतनाचा विषय आहे. यापुढील काळात संजय पवार यांच्या हाती तालुक्यातील भाजपाची सूत्रे असणार आहेत. हा बदल लक्षणीय आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी विजयानंतर यापुढे सुहास कांदे हेच शिवसेनेचा विधानसभेचा चेहरा असतील हे भाकीत जाहीरपणे केले असले तरी पुढील काळात बरेच पाणी वाहणार आहे. या निवडणुकीच्या निकालाने बापूसाहेब कवडे हेच किंग मेकर आहेत. ही बाब सिध्द झाली आहे. पंधरा वर्षांपूर्वी सेनेची सत्ता पंसवर आली तेव्हा ते व संजय पवार एकत्र होते. नगरपालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी सोडून माजी आमदार संजय पवार भाजपात दाखल झाले. मात्र भाजपाला एकही जागा पालिकेत मिळाली नव्हती. जि.प. - पं.स.मध्ये एक गट व तीन गणांमध्ये त्यांचे उमेदवार विजयी झाले. तालुक्यात शिवसेना लढली ती सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली व बापूसाहेब कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली. राज्यमंत्री दादाभाऊ भुसे यांचे मोठे योगदान यात आहे. तथापि नांदगाव तालुक्याच्या राजकारणात कांदे आल्यानंतर येथील बहुतांश शिवसेना एका सूत्रात बांधली गेल्याचे चित्र आहे.2002 नंतर तब्बल पंधरा वर्षांनी नांदगाव पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. घड्याळ व पंजा नंतर भगवे राज अवतरले आहे. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारणाचा नारा देणाऱ्या शिवसेनेने ग्रामीण भागाच्या पाणी, रस्ते या समस्यांसह शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे शिवबंधन बांधावे, अशी अपेक्षा आहे. अर्थात त्यांचा मुकाबला भाजपा गण सदस्यांशी आहे. पंचायत समिती चालविताना भाजपाचे सहकार्य सेना घेणार की दोहोंचा संघर्ष बघायला मिळणार ते पाहणे मनोरंजक ठरणार आहे.