पंचायत राज सप्ताहात होणार जनजागृती
By Admin | Updated: April 4, 2015 01:10 IST2015-04-04T01:10:33+5:302015-04-04T01:10:58+5:30
पंचायत राज सप्ताहात होणार जनजागृती

पंचायत राज सप्ताहात होणार जनजागृती
नाशिक : पंचायत राज बळकटीकरणासाठी २४ एप्रिल हा पंचायत राज दिन म्हणून, तर २४ एप्रिल ते १ मे दरम्यान पंचायत राज सप्ताह आयोजित करून शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्याचे आदेश ग्रामविकास व जलसंधारण विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत. यासंदर्भात नुकतेच शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या २४ मार्च रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार येत्या २४ एप्रिल रोजी जिल्हा पातळीवर पंचायत राज दिवस म्हणून पाळण्यात यावा तसेच जिल्हास्तरावर यासंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे. तसेच पंचायत समिती स्तरावरही २४ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान पंचायत राज सप्ताह पाळण्यात येऊन कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावेत, असे परिपत्रकात म्हटले आहे. तसेच २४ एप्रिल ते १ मे दरम्यान ग्रामपंचायत पातळीवर पंचायत राज सप्ताह पाळण्यात येऊन त्याअनुषंगाने विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात यावेत. ग्रामसभेत नियमित विषयांसह ग्रामसभेत पर्यावरण संतुलित ग्रामसमृद्ध योजना, (वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन), शून्य ते सहा वयोगटांतील बालकांमधील मुला-मुलींचे प्रमाण, प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, जलयुक्त शिवार अभियान, तंबाखूजन्य पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्परिणाम व विशेष साहाय्य योजना जसे आम आदमी विमा योजना, शिष्यवृत्ती, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आदि योजनांची माहिती यासह विविध विषयांद्वारे जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. (प्रतिनिधी)