लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : तालुक्यातील सावखेडे येथे कृषी विभागामार्फत‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ या मोहिमेंतर्गत जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मागेल त्याला शेततळे, सूक्ष्म सिंचन, पीक प्रात्यक्षिक, शेतकरी सहल, माती परीक्षण, कृषी यांत्रिकीकरण, पायाभूत सुविधा या विषयांवर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. गावातील हनुमान मंदिरात आयोजित या कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी अभय फलके यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. तालुका मंडल कृषी अधिकारी जगदीश तुंबारे यांनी समृद्ध शेतकरी योजनेचा उद्देश स्पष्ट केला. सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी हे अभियान असल्याचे त्यांनी सांगितले. पिकांचे तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, प्रचारपद्धती, सूक्ष्म सिंचन, कांदाचाळ याविषयी सविस्तर माहिती दिली. कृषी सहायक मंगेश कोकतरे यांनी माती नमुने, जमीन आरोग्यपत्रिका, फर्टिलायझर कॅल्क्युलेटर वापरून रासायनिक खतांचा वापर करणे, शेतकरी मासिक, कृषीविषयक अॅप आदींविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी केदू गोरे, माणिक गोरे, सुरेश गोरे, शंकर गोरे, पुंजाराम गोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सावखेडे येथे कृषी विभागातर्फे जनजागृती
By admin | Updated: June 10, 2017 00:37 IST