खरीप, रब्बीसाठी अनुदान द्यावे
By Admin | Updated: July 28, 2014 00:42 IST2014-07-27T23:03:32+5:302014-07-28T00:42:26+5:30
दुष्काळी स्थिती : सायाळे येथील शेतकऱ्यांची मागणी

खरीप, रब्बीसाठी अनुदान द्यावे
सिन्नर : शासनाने दुष्काळी शेतकऱ्यांसाठी दिलेले नुकसानभरपाईचे अनुदान अद्याप मिळाले नाही. खरीप व रब्बी हंगामाचे निवेदन त्वरित देण्याची मागणी सायाळे येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या मागणीचे निवेदन येथील शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे. या भागातील शेतकऱ्यांना सन २०१२ - १३ या वर्षातील खरीप व रब्बी हंगामातील अनुदान अद्याप प्राप्त झाले नाहीत. याबाबत येथील शेतकरी रोज तलाठी कार्यालयात चकरा मारुन कंटाळले आहेत.
पाथरे येथील नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेतही शेतकरी चकरा मारतात. मात्र अद्याप अनुदान प्राप्त झाले नसल्याचे तेथील अधिकारी सांगत आहेत. तालुक्याच्या पूर्वभागात सलग चौथ्या वर्षीही पाऊस झाला नसल्याने दुष्काळी स्थिती आहे. गेल्या तीन वर्षांपासून शेतीतील नऊ हंगाम पावसाअभावी वाया गेले आहे. त्याच उन्हाळ््यात गारपीट व वादळी पावसाने उभ्या असलेल्या विविध पिकांचे नुकसान झाले होते.
त्यापूर्वी रब्बी हंगामात जोरदार वादळी व अवकाळी पावसाने गहू, हरभरा व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर शासनाच्या कृषी विभाग व महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात आले होते. मात्र त्याच्या भरपाईचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे अगोदरच आर्थिक अडचणी असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा दुसऱ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते आहे.
शासनाकडे अनेकदा मागणी करूनही शासनाकडून अद्याप अनुदानाबाबत काहीही हालचाली होत नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवेदनावर रतन गोरे, विजय शिंदे, मच्छिंद्र गोरे, सुशीला गोरे, रामभाऊ गवारे, गणपत शिंदे, सुंदराबाई शिंदे, योगेश शेळके, दादा बुरकुले, देवराम शेळके, भाऊसाहेब शेळके, योगेश शेळके आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)