अतिरिक्त कामाचा मोबदला द्यावा
By Admin | Updated: April 3, 2016 03:49 IST2016-04-03T03:49:24+5:302016-04-03T03:49:25+5:30
सातपूर विभागीय कार्यालय : कर्मचाऱ्यांची मागणी

अतिरिक्त कामाचा मोबदला द्यावा
सातपूर : जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत हक्काच्या सुट्यांच्या दिवशी काम केल्याच्या बदल्यात मेहनताना किंवा बदली सुट्या मिळाव्यात, अशी मागणी महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी केली आहे.
जानेवारी ते मार्चदरम्यान घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या होत्या. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार उपआयुक्तांनी २२ जानेवारी रोजी सहाही विभागांना परिपत्रक काढून २३ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान दुसरा व चौथा शनिवार, सर्व रविवार आणि सार्वजनिक सुट्या रद्द केल्याचे सूचित केले होते.
आयुक्तांच्या आदेशाचे काटेकोर पालन करीत घरपट्टी आणि पाणीपट्टी विभागातील कर्मचाऱ्यांनी एकही सुटी न घेता तीन महिने नियमित कामकाज केले आहे. नियमित कामकाज केल्यामुळे महापालिकेच्या वसुलीचे उद्दिष्ट साध्य झाले आहे.
सलग तीन महिन्यांत हक्काची एकही सुटी न घेता कामकाज केले आहे. त्यामुळे या अतिरिक्त कामाचा मेहनताना मिळावा किंवा बदल्या सुट्या मिळाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
महापालिकेच्या नाशिकरोड, सिडको, पंचवटी, पूर्व विभाग, सातपूर, पश्चिम विभाग या सहाही विभागातील जवळपास दोनशे ते अडीचशे कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त काम केले आहे. त्यामुळेच वसुलीचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत झाली असल्याने आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घ्यावी, अशीही मागणी घरपट्टी व पाणीपट्टी विभागातील कर्मचाऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)