नाशिक : उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रंगपंचमीच्या दिवशी झालेल्या जाधव बंधूंच्या हत्याकांडात जे पोलिस अधिकारी व कर्मचारी सामील असतील त्यांच्यावर बडतर्फीची कार्यवाही करावी, शासनामार्फत या परिवारास तत्काळ ५० लाखांची मदत व एका व्यक्तीस सरकारी नोकरीत सामावून घ्यावे, आदी मागण्यांसाठी कडक उन्हात आंबेडकरी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.
यावेळी पोलिस प्रशासनाच्या कामकाजाविरोधात निदर्शनेही केली. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रंगपंचमीच्या दिवशी दोघा भावांची हत्या घडली होती. याप्रकरणी तपास करण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष चौकशी समितीची स्थापना करत समितीच्या प्रमुखपदी गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांची नियुक्ती केली होती; पण या घटनेला पंधरा दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही आरोपींना अटक व इतर तपासासंदर्भामध्ये उशीर होत असल्याचा आरोप करीत त्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत पोलिस प्रशासनाच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले.
या प्रकरणातील दोषी पोलिसांचे तत्काळ निलंबन करण्याची मागणी केली. भर उन्हात उपनगर पोलिस ठाणे हद्दीतून निघालेला हा मोर्चा शालिमार, एमजी रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. पोलिस प्रशासनाविरोधातील फलक हातात घेऊन यावेळी आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. यामुळे सीबीएसकडून अशोकस्तंभाकडे जाणारी एकेरी वाहतूक तब्बल तासाभरासाठी ठप्प झाली होती.