चांदवडला भूमिगत गटारीसाठी निधी प्रस्तावित
By Admin | Updated: October 22, 2016 23:21 IST2016-10-22T23:20:42+5:302016-10-22T23:21:31+5:30
भूषण कासलीवाल : टंचाईकाळात लक्ष; खोकड तलावाच्या साठवण क्षमतेत वाढ

चांदवडला भूमिगत गटारीसाठी निधी प्रस्तावित
चांदवड : शहराचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. टंचाई काळात विशेष लक्ष घातले असून, शहराला महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या माध्यमातून सुमारे सात किलोमीटर भूमिगत गटारीसाठी चार कोटी ३९ लाख रुपयांचे काम प्रस्तावित असल्याची माहिती नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुढील महिन्यात हे काम सुरु होईल. या गटारीतील पाण्याचे शुध्दीकरण करून हे पाणी जवळपासच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी दिले जाईल. जेणेकरुन नगर परिषदेच्या उत्पन्नात भर पडेल, असे कासलीवाल यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष कविता उगले, शिवसेना गटनेते व नगरसेवक जगन्नाथ राऊत, कॉँग्रेस गट नेते व नगरसेवक रवींद्र अहिरे, अॅड. नवनाथ अहेर, देवीदास शेलार, राजकुमार संकलेचा, अल्ताफ तांबोळी, अशपाक खान, बाळु वाघ, नगरसेवक मीनाताई कोतवाल, रेखा गवळी, पार्वताबाई पारवे, लीलाबाई कोतवाल, विलास पवार, बाळासाहेब वाघ, संदीप उगले आदि उपस्थित होते.
भविष्यात खोकड तलावाजवळील विहीर, गोई बंधारा, राहुड बंधारा येथे पाणीबुड्या टाकून चांदवड शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियंोजन आहे. खोकड तलावातील गाळ माजी आमदार शिरीष कोतवाल व आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या प्रयत्नाने काढण्यात आला असून, या तलावाची साठवण क्षमता वाढली आहे.
लवकरच या तलावाचा सांडवा पडेल व त्याचे जलपूजन करण्याचा मानस राऊत यांनी व्यक्त केला. तर नगराध्यक्ष कासलीवाल यांनी पालकमंत्र्याच्या माध्यमातून धोंडबा ते चांदवड पाणीपुरवठा एक्स्प्रेस पाइपलाइन मंजूर केली आहे, अशी माहिती दिली.
चांदवड शहरात होणाऱ्या जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. येत्या २० वर्षाचा विचार करुन शहरातील वसाहतीचा सर्व्हे करणार आहे. पुढील काळात मीटरद्वारे पाणी देण्याचा विचार असल्याचे कासलीवाल यांनी सांगितले. गावांतर्गत गटारीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु आहे. शहरासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला असून १७ प्रभागात विकासकामे केली जातील असे सांगण्यात आले. (वार्ताहर)
आठवडेबाजारासाठी जागेचा प्रस्ताव गत काळात गटनंबर चुकीचा असल्याने आता तो बदलुन मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यातयेईल चांदवड शहरातील १४०० घरामध्ये शौचालये देण्यात येतील त्यासाठी १७ हजार रुपये निधी देणार आहे. केदं्राकडून १२ हजार व नगरपरिषदेकडून पाच हजार रुपये अनुदान देण्यात येईल असे सांगीतले तर गत काळातील ग्रामपंचायतीचा निधी परत जाऊ नये माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या काळात मंजुर झालेल्या १३ व्या वित्त आयोगातंर्गत गणेशमंदिर ते गणूर चौफुलीचे कामास नुकताच प्रारंभ झाल्याचे जगन्नाथ राऊत यांनी सांगीतले. तर चांदवड शहराचा आराखडा , रस्ते, गटारी, विकासाची कामे करण्यासाठी तज्ञ इंजिनिअर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन आराखडा तयार करण्याचे काम सुरु असल्याचे शेवटी नगराध्यक्ष कासलीवाल यांनी सांगीतले.