वनविकास महामंडळाकडून वृक्षलागवडीचा प्रस्ताव

By Admin | Updated: September 13, 2016 01:22 IST2016-09-13T01:22:02+5:302016-09-13T01:22:37+5:30

महापालिका : दहा फुटांवरील वृक्ष उपलब्ध करून देण्याचा दावा

Proposal for Tree Plant from Development Development Corporation | वनविकास महामंडळाकडून वृक्षलागवडीचा प्रस्ताव

वनविकास महामंडळाकडून वृक्षलागवडीचा प्रस्ताव

नाशिक : महापालिकेमार्फत शहरात २१ हजार वृक्षलागवडीचा कार्यक्रम ठेकेदारांमार्फत राबविण्याचा प्रयत्न अजूनही पूर्णत्वाला जाऊ शकलेला नाही. महापालिकेला आता दुसऱ्यांदा निविदाप्रक्रिया राबवावी लागत असतानाच राज्य शासनाच्या वनविकास महामंडळाने महापालिकेसमोर वृक्षलागवडीचा प्रस्ताव ठेवला असून, दहा फुटांवरील वृक्ष उपलब्ध करून देण्याचा दावा केला आहे.
महापालिकेने सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरात २१ हजार वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम ठेकेदारांमार्फत राबविण्याचे ठरविले, परंतु गेल्या ११ महिन्यात वारंवार निविदाप्रक्रिया राबविण्यात येऊनही प्रत्यक्ष लागवडीला सुरुवात होऊ शकलेली नाही. पहिल्यांदा निविदाप्रक्रिया राबविली त्यावेळी नऊ ठेकेदारांनी प्रतिसाद दिला होता तर त्यातील पाच ठेकेदारांना कार्यादेश देण्यात आले होते, परंतु १५ फुटांवरील भारतीय प्रजातीच्या वृक्षलागवडीची अट ठेवल्याने पाच पैकी चार ठेकेदारांनी प्रक्रियेतून माघार घेतली. त्यामुळे महापालिकेने संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली. केवळ ‘कल्पतरू’ या कंपनीने वृक्षलागवडीला संमती दर्शविली आणि काम सुरू केले. उर्वरित १५ हजार वृक्ष लागवडीसाठी महापालिकेने आता दुसऱ्यांदा निविदाप्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी १५ फुटांवरील वृक्षलागवडीची अट शिथिल करत ती दहा फुटांवर आणली आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी मनपाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन वृक्षलागवडीचा प्रस्ताव ठेवला आहे. महामंडळाने यापूर्वी ठाणे, पुणे आणि वसई येथे स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबर वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविला आहे. महामंडळामार्फत १० फुटांवरील वृक्ष उपलब्ध करून देण्याचा दावा करतानाच कमी खर्चात लागवडीचा कार्यक्रम होण्याचा दावाही करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेची आर्थिक बचतच होणार आहे. महापालिकेने १५ हजार वृक्षलागवडीसाठी तीन कोटी ९५ लाख रुपये खर्चाच्या निविदा काढल्या आहेत. महापालिका आता याबाबत नेमकी काय भूमिका घेते यावरच वृक्षलागवडीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Proposal for Tree Plant from Development Development Corporation