अतिरिक्त आयुक्तपदाबाबत अटी शिथिल करण्याचा प्रस्ताव
By Admin | Updated: March 14, 2015 00:41 IST2015-03-14T00:41:00+5:302015-03-14T00:41:11+5:30
आयुक्तांचे शासनाला पत्र : पालिका अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्याची शिफारस

अतिरिक्त आयुक्तपदाबाबत अटी शिथिल करण्याचा प्रस्ताव
नाशिक : महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी बाहेरील अधिकाऱ्याची शासनाने नियुक्ती केल्यानंतर आणखी एका रिक्त पदासाठी पालिकेतीलच उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्याची आणि त्यासाठी शासनाने ठेवलेल्या अटी शिथिल करण्याची मागणी करणारे पत्र महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी नगरविकास खात्याला पाठविले आहे.
नाशिक महापालिकेला ‘ब’ वर्ग मिळाल्यानंतर दोन अतिरिक्त आयुक्तपद निर्माण करण्यात आले आहेत. त्यातील एका पदावर अनिल चव्हाण यांची शासनाने प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली आहे, तर दुसरे पद अद्याप रिक्त आहे. या पदासाठी महापालिकेतीलच पदोन्नतीने उपआयुक्तपदापर्यंत पोहोचलेल्या अधिकाऱ्यास सेवाज्येष्ठतेनुसार संधी मिळावी यासाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने नगरविकास खात्याकडे मागणी केली आहे. आता खुद्द पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनीही पालिकेतील सेवाज्येष्ठतेनुसार उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यास अतिरिक्त आयुक्तपदी संधी देण्याची आणि त्यासाठी ठेवलेल्या अटी शिथिल करण्याविषयी नगरविकास खात्याला पत्र पाठविले आहे.
शासनाने अतिरिक्त आयुक्तपदासाठी उपआयुक्तपदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असावा, संबंधित अधिकाऱ्याचे दहा गोपनीय अभिलेखांपैकी नऊ गोपनीय अभिलेख अत्युकृष्ट असावेत आदि अटी टाकलेल्या आहेत; परंतु या अटी पालिकेतील स्थानिक अधिकारी कोणीही पूर्ण करू शकत नसल्याने त्यांना अतिरिक्त आयुक्त या पदापासून वंचित राहावे लागत आहे. एकतर शासनाने अटी शिथिल कराव्यात आणि स्थानिक अधिकाऱ्यांना संधी द्यावी अन्यथा लवकरात लवकर प्रतिनियुक्तीवर अतिरिक्त आयुक्तपद तातडीने भरावे, अशी मागणी शासनाकडे आयुक्तांनी केली आहे. दरम्यान, आयुक्तांनी शासनाकडे पत्र पाठविताना महापालिकेत रोहिदास बहिरम आणि हरिभाऊ फडोळ हे दोन उपआयुक्त दर्जाचे अधिकारी असल्याचाही उल्लेख आवर्जून केला आहे. (प्रतिनिधी)