वाहनतळांसाठी शासनाकडे प्रस्ताव

By Admin | Updated: August 13, 2014 00:43 IST2014-08-13T00:11:43+5:302014-08-13T00:43:47+5:30

सिंहस्थ कुंभमेळा : खासगी जमिनींचे तात्पुरते अधिग्रहण

Proposal to the Government for parking | वाहनतळांसाठी शासनाकडे प्रस्ताव

वाहनतळांसाठी शासनाकडे प्रस्ताव

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा तेरा महिने चालत असला, तरी या दरम्यान येणाऱ्या शाही पर्वणीला अधिक महत्त्व असल्याने व याच दिवशी स्रानासाठी कोट्यवधी भाविकांचे नाशिक व त्र्यंबकेश्वरी आगमन होत असल्याने त्या दिवशी वा त्याच्या आदल्या दिवशी हजारोंच्या संख्येने दाखल होणाऱ्या वाहनांसाठी तात्पुरत्या वाहनतळांची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी खासगी व सरकारी अशा दोन्ही प्रकारच्या जागा अधिग्रहित करण्यात येणार असून, तसा प्रस्ताव शासनदरबारी सादर करण्यात आला आहे.
नाशिक शहराला येऊन मिळणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर बाह्य वाहनतळ उभारण्यात येणार असून, त्याठिकाणी भाविकांनी आपली खासगी वाहने उभी केल्यानंतर तेथून त्यांना शहरांतर्गत वाहनतळापर्यंत एस.टी. बसने आणण्यात येणार
आहे.
बाह्य वाहनतळ ते अंतर्गत वाहनतळापर्यंतचे अंतर साधारणत: पाच ते सात किलोमीटर इतके असून, अंतर्गत वाहनतळापासून ते थेट रामघाटापर्यंत मात्र भाविकांना पायीच अंतर कापावे लागणार आहे, जेणेकरून शहरात वाहनांना प्रवेशबंदी करून सर्व प्रकारच्या रस्त्यांवरून फक्त पादचाऱ्यांनाच प्राधान्य असणार आहे. बाह्य व अंतर्गत वाहनतळ कोठे असावे, त्याची रचना, उपयोगिता व तेथे करावयाच्या सुविधांबाबतही प्रशासनाने विचार केला असून, महापालिका, पोलीस, एस.टी. महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तरीत्या वाहनतळांच्या जागांची पाहणी करून त्यांची निश्चिती केली आहे.
विशेष करून त्यासाठी काही खासगी जागा नऊ ते दहा महिन्यांसाठी अधिग्रहित कराव्या लागणार आहेत. तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठवून जागा अधिग्रहित करण्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्याची नेमणूक झाल्यास साधारणत: महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Proposal to the Government for parking