डास नियंत्रणासाठी महापालिकेचा समिती स्थापनेचा प्रस्ताव
By Admin | Updated: October 22, 2016 01:51 IST2016-10-22T01:49:59+5:302016-10-22T01:51:02+5:30
नियोजन : २० दिवसांत डेंग्यूचे ७५ रुग्ण

डास नियंत्रणासाठी महापालिकेचा समिती स्थापनेचा प्रस्ताव
नाशिक : गेल्या तीन-चार वर्षांपासून डेंग्यूने शहराला पछाडल्याने हैराण झालेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता डासांवर नियंत्रण मिळविण्यासाठी बृहन्मुंबईच्या धर्तीवर नाशिकमध्येही डास नियंत्रण समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, समितीमार्फत वर्षभर उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे. दरम्यान, शहरात वातावरणात बदल होऊनही गेल्या २० दिवसांत शहरात डेंग्यूचे २८२ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून, त्यापैकी ७५ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले आहे.
शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस भरच पडते आहे. महापालिकेच्या वतीने डेंग्यूच्या डासांवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष कृती अभियान राबवूनही अद्यापपावेतो एडीस जातीच्या डासांच्या अळ्या सापडत आहेत. नागरिकांच्या प्रबोधनावर भर देऊनही डेंग्यूच्या संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग हतबल झाला
आहे. महापालिकेने आता यापुढे डेंग्यूसह मलेरिया व डासांपासून उद्भवणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे बृहन्मुंबईच्या धर्तीवर नाशिक महापालिकेतही डास नियंत्रण समितीची स्थापना केली जाणार असून, आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत डास उत्पत्तीशी निगडित असलेला बांधकाम विभाग, भुयारी गटार, पाणीपुरवठा, नगररचना, स्वच्छता, मलेरिया, शिक्षण तसेच क्रेडाई, निमा-आयमा, आयएमए यांच्या प्रतिनिधींचा
सदस्य म्हणून समावेश असणार आहे. सदस्य सचिव म्हणून आरोग्याधिकाऱ्यांची नियुक्ती होईल. सदर समितीच्या वर्षातून तीनदा सभा होतील. या सभांच्या माध्यमातून त्या-त्या परिस्थितीनुसार डास निर्मूलनासाठी कृती कार्यक्रमाची आखणी करून उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)