समितीऐवजी पुन्हा शिक्षण मंडळ स्थापण्याचा प्रस्ताव
By Admin | Updated: May 17, 2017 00:32 IST2017-05-17T00:31:03+5:302017-05-17T00:32:04+5:30
महापालिका : मनसेचा मात्र प्रस्तावास विरोध

समितीऐवजी पुन्हा शिक्षण मंडळ स्थापण्याचा प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेच्या शिक्षण समितीऐवजी पुन्हा एकदा शिक्षण मंडळ स्थापन करण्याच्या हालचाली सत्ताधारी भाजपाकडून सुरू झाल्या असून, त्याबाबतचा प्रस्ताव येत्या महासभेवर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रस्तावाला मनसेने विरोध दर्शविला असून, मंडळाऐवजी समितीच कायम ठेवण्याची मागणी केली आहे.
दोन वर्षांपूर्वी महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त करत शासनाने शिक्षण समिती अस्तित्वात आणली आहे. महासभेनेही त्यास मंजुरी देत समितीवर नगरसेवकांमधूनच १६ सदस्य नेमणुकीस हिरवा कंदील दाखवला होता. त्यानुसार, मागील पंचवार्षिक काळात शिक्षण समिती गठितही झाली होती. परंतु, सदर समितीला काहीही अधिकार प्राप्त नसल्याचे सांगत तत्कालीन सभापती संजय चव्हाण यांनी न्यायालयात दादही मागितली होती, शिवाय शासनाकडेही पत्रव्यवहार केला होता. आता सदर समितीऐवजी पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच शिक्षण मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव भाजपा गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी येत्या गुरुवारी (दि.१८) होणाऱ्या महासभेत ठेवला आहे. मात्र, मनसेचे पदाधिकारी संदीप भवर तसेच योगेश घोडे यांनी या प्रस्तावास विरोध दर्शविला आहे. भवर आणि घोडे यांनी त्याबाबत म्हटले आहे, शिक्षण समिती अस्तित्वात आल्यापासून कामकाजात पारदर्शकता दिसून येत आहे. प्रशासनाधिकारी व आयुक्तांना अधिकार प्रदान केले असल्याने विद्यार्थी व कर्मचारी हिताचे निर्णय घेतले गेले आहेत.