संयुक्त मंच स्थापन करण्याचा प्रस्ताव

By Admin | Updated: August 3, 2014 01:11 IST2014-08-03T01:06:09+5:302014-08-03T01:11:11+5:30

संयुक्त मंच स्थापन करण्याचा प्रस्ताव

A proposal to establish a joint forum | संयुक्त मंच स्थापन करण्याचा प्रस्ताव

संयुक्त मंच स्थापन करण्याचा प्रस्ताव

 

सुदीप गुजराथी

नाशिक
काही खासगी डॉक्टरांकडून होणाऱ्या रुग्णांच्या पिळवणुकीला आळा बसावा, तसेच रुग्णांना भेडसावणाऱ्या अडचणींची सोडवणूक व्हावी, या उद्देशाने येथील ग्राहक पंचायतीने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नाशिक शाखेपुढे बारा वर्षांपूर्वीच संयुक्त मंच स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता; मात्र या प्रस्तावाला अद्यापही प्रतिसाद मिळू शकलेला नाही. दरम्यान, काही डॉक्टरांकडून होणाऱ्या आर्थिक लुटीबाबत रुग्णच नव्हे, सामान्य नागरिकांनीही एकत्र येऊन वैद्यकीय बाजारीकरणविरोधी मंचाची स्थापना करण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. संवाद वाढवण्यास ‘आयएमए’ तयार
समाजातल्या काही डॉक्टरांकडून रुग्णांची फसवणूक होते, हे खरे आहे. काही डॉक्टर आर्थिक प्रलोभनांना बळी पडून असे कृत्य करतात; मात्र अशा डॉक्टर्सची संख्या खूपच कमी आहे. त्यांच्यामुळे सगळे वैद्यकीय क्षेत्र बदनाम होते. कट प्रॅक्टिस, डॉक्टरांचे लॅबचालकांशी असलेले साटेलोटे हा चिंतेचा विषय आहे; मात्र डॉक्टरांनी कट प्रॅक्टिसला बळी पडता कामा नये. रुग्ण व डॉक्टरांच्या अडचणींचे निराकरण करण्याची ‘आयएमए’ची तयारी आहे; मात्र एखाद्या गैरवर्तन करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करणे अथवा त्याची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार ‘आयएमए’ला नाहीत. या समस्येवर सोपा उपाय म्हणजे, डॉक्टर व रुग्ण यांच्यातील सुसंवाद वाढायला हवा. डॉक्टर व नागरिकांत एकप्रकारची दरी निर्माण झाली आहे. ती कमी व्हायला हवी. गेल्या काही वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे, सिटीस्कॅन, रेडिओलॉजी वगैरे सोयी उपलब्ध झाल्या आहेत; मात्र हे दुधारी अस्र आहे.
समजा, एखादा लहान मुलगा उंचावरून पडला. डॉक्टरने त्याला तपासून सिटीस्कॅन करण्याची सूचना केली. सिटीस्कॅनचा रिपोर्ट ‘नॉर्मल’ आल्यावर मुलाच्या वडिलाने खूश व्हावे की नाराज? हा रिपोर्ट ‘नॉर्मल’ आल्यावर पालक असा आक्षेप घेऊ शकतात की, डॉक्टरांनी गरज नसताना सिटीस्कॅन करायला लावले; मात्र डॉक्टरने त्या मुलाला नुसत्या गोळ्या-औषध देऊन घरी पाठवले आणि दुसऱ्या दिवशी जर मुलाची प्रकृती बिघडली असती, तरी पालकांनी नीट उपचार न झाल्याचा आक्षेप घेतलाच असता! हे टाळण्यासाठी संवाद वाढायला हवा. या क्षेत्रात काही चुकीच्या परंपरा रूढ झाल्या आहेत, हे मान्य. प्रत्येकाने आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने प्रॅक्टिस करावी. या क्षेत्राला काळिमा लागू नये, यासाठी संपूर्ण समाजानेच काळजी घ्यायला हवी. पूर्वी डॉक्टर व रुग्ण यांचा एकमेकांवर विश्वास होता. पूर्वीही उपचार करताना पेशंट दगावत असत. किंबहुना सध्यापेक्षा पूर्वी हे प्रमाण अधिक होते; मात्र परस्परांवरील विश्वासामुळे वाद होत नसत. तशी परिस्थिती पुन्हा निर्माण करण्यासाठी संवाद वाढवण्यावर भर द्यायला हवा आणि त्यासाठी ‘आयएमए’ कधीही तयार आहे.
- डॉ. राहुल अहेर,
अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिक शाखा ग्राहक पंचायतीची मदत घ्या...
हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध सुविधांचे दरपत्रक लावणे बंधनकारक आहे; मात्र हा नियम कोणीही पाळत नाही. रुग्णालयांत मिळणाऱ्या सुविधांच्या दरांत तफावत असतेच; शिवाय पारदर्शकताही नसते. ‘आयसीयू’चे उदाहरण घेऊ या. ‘आयसीयू’त किमान कोणत्या सुविधा असाव्यात, देखरेखीसाठी किती कर्मचारी असावेत, याचे काही निकष ठरलेले असावेत. रुग्णांवरील उपचारांच्या बिलांची पडताळणी करायला हवी; मात्र आपल्याकडे अशी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. रुग्णालयांच्या नफा कमवण्यावर आक्षेप नाही; मात्र तो किती कमवावा आणि कोणत्या परिस्थितीत, यावर निर्बंध आणण्याची नक्कीच गरज आहे. अनेकदा लोक बिल नीट पाहतही नाहीत. शिवाय हॉस्पिटलमध्ये लोक ‘भाव’ करण्याच्या मन:स्थितीत नसतात. त्यातूनच त्यांची लूट होते. यासाठी हॉस्पिटलच्या बिलाची पडताळणी करणारी यंत्रणा निर्माण होणे गरजेचे आहे. एखाद्या आजारातील उपचारांवर किती खर्च येईल, याचा किमान अंदाज तरी रुग्णांना द्यायला हवा. अत्यवस्थ रुग्णाला लावले जाणारे ‘व्हेंटिलेटर’ हा तर एक स्वतंत्र विषय आहे. अनेकदा रुग्णाला नुसते ‘व्हेंटिलेटर’ लावून ठेवून आभासी पद्धतीने जिवंत ठेवले जाते. डॉक्टर याची कल्पना रुग्णाच्या नातेवाइकांना देत नाहीत. त्यामुळे बिलाचा आकडा फुगत जातो. या सगळ्या फसवणुकीला चाप बसणे गरजेचे आहे. आमच्या ग्राहक पंचायतीकडे अशा स्वरूपाच्या तक्रारी येत असतात. आम्ही याबाबत तज्ज्ञांचीही मदत घेतो. कोणाला आपली फसवणूक झाली असे वाटत असेल तर त्यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, जी-६, धर्मराज प्लाझा, जुना गंगापूर नाका, नाशिक या पत्त्यावर सोमवारी व शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता संपर्क साधावा.
- प्रा. दिलीप फडके,
केंद्रीय कार्यकारिणी सदस्य,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत

Web Title: A proposal to establish a joint forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.