मालमत्ता सर्वेक्षण, मनपाची हेल्पलाइन
By Admin | Updated: January 6, 2017 00:47 IST2017-01-06T00:47:36+5:302017-01-06T00:47:47+5:30
बोगस कर्मचारी आढळल्यास संपर्काचे आवाहन

मालमत्ता सर्वेक्षण, मनपाची हेल्पलाइन
नाशिक : महापालिकेने शहरात खासगी एजन्सीमार्फत मिळकत सर्वेक्षण सुरू केले असले तरी सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र नसल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन मनपाने हेल्पलाइन सुरू केली असून, बोगस कर्मचारी आढळल्यास त्यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेने मिळकत सर्वेक्षणाचे काम हाती घेतले असून, त्यासाठी नवी दिल्लीच्या जिओ इन्फोसिस टेक्नॉलॉजिक्स या संस्थेची नियुक्ती केली आहे. सदर सर्वेक्षणाकरिता प्रारंभी पश्चिम विभागाची निवड करण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. संबंधित खासगी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात आले असून, त्यांच्याकडे मिळकत सर्वेक्षणासंबंधी अधिकार प्रमाणपत्रही देण्यात आले आहे.
ज्या कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र व मनपाचे प्रमाणपत्र नसेल, अशा लोकांना घरात प्रवेश देऊ नये, असे आवाहन नागरिकांना केले आहे.
बोगस कर्मचारी असल्याचे लक्षात आल्यास संबंधितांनी ७७६८००८७४० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आयुक्तांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)