प्रॉपर्टी डीलरची गोळी झाडून हत्त्या

By Admin | Updated: February 17, 2016 23:38 IST2016-02-17T23:37:42+5:302016-02-17T23:38:58+5:30

जैन भवनजवळील घटना : चौघे संशयित फरार; पूर्ववैमनस्यातून चिघळला वाद

A property dealer shot a bullet | प्रॉपर्टी डीलरची गोळी झाडून हत्त्या

प्रॉपर्टी डीलरची गोळी झाडून हत्त्या

नाशिकरोड : जयभवानी रोड येथील तरुण रणजित मकवाना याची मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पूर्ववैमन्यस्यातून गोळी झाडून हत्त्या करण्यात आली. आर्टिलरी सेंटररोडवरील जैन भवन जवळ सदर घटना घडली. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले.
याप्रकरणी मयत रणजितच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार जयभवानी रोड फर्नांडिसवाडी येथील देवरथ अपार्टमेंट येथे राहणारा रणजित जगशरण मकवाना (वय ३५) याचा प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. मंगळवारी रात्री पाउणच्या सुमारास रणजित घरी परतला असता फर्नांडिसवाडी येथे राहणारे रोहित ऊर्फ माले गोविंद डिंगम, मयूर चमन बेद, संजय ऊर्फ मॉडेल चमन बेद, विनोद राजाराम साळवे हे चौघे रणजित यांच्याशी इमारतीखालीच बोलत होते. त्यानंतर रणजित कपडे बदलून या चौघांसोबत जाण्यास निघाला असता त्याची पत्नी आणि आई यांनी त्यास या चौघांसोबत जाण्यास मज्जाव केला; मात्र रणजित हा आपली अ‍ॅक्टिव्हा दुचाकी घेऊन त्यांच्यासोबत गेला.
संशयित चौघे आणि रणजित यांच्यात यापूर्वी वाद झालेला असल्याने रणजितची पत्नी गीता, आणि बहीण पूनम यांनी रस्त्याने जाणारी एक रिक्षा थांबवून लागलीच रणजित याच्या मागे त्या गेल्या असता आर्टिलरी सेंटररोड जैन भवन येथे रणजितला चौघे संशयित जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी रणजितला मारू नका असा आवाज दिला असता मयूर बेद, संजय ऊर्फ मॉडेल बेद, विनोद साळवे यांनी रणजितचे दोन्ही हात पकडून ठेवले तर रोहित ऊर्फ माले डिंगम याने गावठी कट्टा काढून रणजितच्या डोक्यात पाठीमागून गोळी झाडली. रणजित रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडताच चौघे संशयित पसार झाले.
आर्टिलरी सेंटररोड येथे युवकावर गोळीबार करून त्याची हत्त्या करण्यात आल्याची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रणजितला त्वरित बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले.
सदर घटनेचे वृत्त जयभवानी रोड व परिसरात समजताच नातेवाईक, युवकांनी बिटको रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. यामुळे परिसरात दहशत व तणावाचे वातावरण पसरले होते.

Web Title: A property dealer shot a bullet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.