घोरपडे बंधंूची १७५ कोटींची मालमत्ता जप्त
By Admin | Updated: November 7, 2015 23:32 IST2015-11-07T23:29:51+5:302015-11-07T23:32:38+5:30
धान्य घोटाळा : पेट्रोलपंप, इमारती, प्लॉटचा समावेश

घोरपडे बंधंूची १७५ कोटींची मालमत्ता जप्त
नाशिक : सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर उघडकीस आलेल्या सिन्नर येथील रेशन धान्य अपहार प्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांत मोक्कान्वये गुन्हा दाखल असलेल्या घटनेत जिल्हा प्रशासनाने या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेले घोरपडे बंधूंच्या सुमारे पावणेदोनशे कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली. त्यात शहरातील विशाल व आकाश असे दोन पेट्रोलपंप, बारा वाहने, इमारती व अनेक रिकाम्या प्लॉट्सचा समावेश आहे.
मोक्का न्यायालयाच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली असून, गुन्हा घडल्यापासून फरार असलेले संपत घोरपडे, अरुण घोरपडे, विश्वास घोरपडे, रतन पवार व रमेश पाटणकर या पाचही जणांच्या मालमत्तेचा पोलिसांनी शोध घेऊन त्याची यादी न्यायालयाला सादर केली होती. सिन्नर तालुक्यातील रेशन दुकानासाठी पाठविण्यात आलेला तांदूळ दुकानात न पोहोचविता तो टेम्पोमध्ये भरून घोटी येथे नेत असताना पोलिसांनी पाठलाग करून वाडीवऱ्हे येथे पकडला होता. त्यावरून अगोदर संशयितांविरुद्ध जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला, नंतर मात्र शासनाने मोक्कान्वये कारवाईचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशान्वये नाशिक, इगतपुरी, दिंडोरी व सिन्नर या चार तालुक्यांतील तहसीलदारांकरवी घोरपडे याच्या मालकीच्या जागा, प्लॉट, शेती, गाळे, इमारतींच्या सातबारा उताऱ्यावर मालमत्ता जप्तीचे शिक्के मारण्यात आले.