प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मिळाले दाखले
By Admin | Updated: August 9, 2015 00:04 IST2015-08-09T00:03:34+5:302015-08-09T00:04:05+5:30
कश्यपी धरण : पुनर्वसनासाठी प्रयत्नांना गती

प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मिळाले दाखले
नाशिक : नाशिककरांची वाढीव तहान भागविण्यासाठी बांधण्यात आलेल्या कश्यपी धरणासाठी संपादित केलेल्या जमिनींच्या मालकांना देण्यात आलेला प्रकल्पग्रस्ताचा दाखला अखेर त्यांच्या वारसांच्या नावावर करण्यास सुरुवात झाली असून, मंगळवारी जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी देवरगाव येथे जाऊन दाखल्यांचे वाटप करतानाच पुनर्वसनाच्या अंगाने सुविधांची पाहणीही केली.
कश्यपी धरणासाठी नाशिक तालुक्यातील देवरगाव, गोळशी, गोंडेगाव, खऱ्याची वाडी या गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. जमिनींच्या मालकांना शासनाचा मोबदला देतानाच, प्रकल्पग्रस्ताचा दाखलाही त्यावेळी देण्यात आला; परंतु या दाखल्याच्या आधारे शासकीय नोकरीत असलेल्या आरक्षणाचा फारसा लाभ प्रकल्पग्रस्तांना होऊ शकला नाही. साधारणत: ४५ वयोगटापर्यंत हा दाखला वैध ठरत असल्याने जमीनमालकांनी सदरचा दाखला वारसांना हस्तांतरित करावा, या मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा चालविला होता. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही करण्यात आले. या गोष्टींची दखल घेत जिल्हा पुनवर्सन अधिकारी मधुमती सरदेसाई-राठोड यांनी अशा प्रकल्पग्रस्तांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागवून त्यावर कार्यवाही सुरू केली. मंगळवारी देवरगाव येथे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिबिर आयोजित करण्यात येऊन त्यात काही प्रकल्पग्रस्तांना दाखले वितरित करण्यात आले. देवरगाव येथेच प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याने त्याठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही पाहणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार गणेश राठोड, नायब तहसीलदार आवारे, मंडल अधिकारी, तलाठी आदि अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)