एकलव्य शाळेत प्रकल्प अधिकाऱ्यांना घेराव
By Admin | Updated: July 10, 2017 17:28 IST2017-07-10T17:28:24+5:302017-07-10T17:28:24+5:30
शहरातील नामांकित विद्यालयात अर्ज करूनही प्रवेश मिळाला नसल्याने सोमवारी (दि.१०) पेठरोडवरील एकलव्य शाळेतपालकांनी एकच गोंधळ घालून प्रकल्प अधिकाऱ्यांना घेराव.

एकलव्य शाळेत प्रकल्प अधिकाऱ्यांना घेराव
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जात असला तरी शहरातील नामांकित विद्यालयात अर्ज करूनही प्रवेश मिळाला नसल्याने सोमवारी (दि.१०) पेठरोडवरील एकलव्य शाळेत विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकच गोंधळ घालून प्रकल्प अधिकाऱ्यांना घेराव घातल्याची घटना घडली आहे. परिसरात अखेर तणावाचे वातावरण पसरल्याने संतप्त पालकांनी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त कार्यालयाकडे धाव घेतली. शाळेत प्रवेशार्थी विद्यार्थ्यांची निवड सोडत पद्धतीने करण्याची प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे ऐकून संतप्त पालकांनी गोंधळ घातला.
आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित शाळेत प्रवेशासाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. गेल्या काही दिवसांपासून पेठरोडवरील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य शाळेत प्रवेशप्रक्रिया सुरू असून, यासाठी जवळपास ५०० विद्यार्थ्यांच्या पालकांनी अर्ज सादर केले आहेत. शाळेत जवळपास २०० ते २५० जागा असल्याने सादर अर्जांची संख्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकणार नाही, असे संबंधितांकडून सुचविण्यात आले. याशिवाय प्रवेशार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांनी जि.प., तसेच खासगी शाळांत प्रवेशासाठी धाव घेतली असता त्यांना प्रवेश मिळाला नाही. सोमवारी प्रवेशप्रक्रिया सुरू असताना पालकांनी शाळेत धाव घेतली असता जागा कमी असल्याने विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया ही सोडत पद्धतीने काढणार असल्याचे सांगण्यात आल्याने पालकांचा संताप अनावर झाला व त्यांनी आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांना खोलीतच घेराव घालून घोषणाबाजी केली. एकलव्य शाळेत काहीतरी गोंधळ झाल्याचे वृत्त कळताच पंचवटी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली, मात्र संतप्त पालकांनी पोलीस वाहन प्रवेशद्वारावरच अडवून धरल्याचे समजते.
अखेर सदर प्रवेशासंबंधी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त निर्णय घेतील, असे सांगण्यात आल्याने संतप्त पालकांनी आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात धाव घेतली होती.