प्राध्यापकांचे असहकार आंदोलन सुरू
By Admin | Updated: February 25, 2016 23:18 IST2016-02-25T22:59:39+5:302016-02-25T23:18:12+5:30
बारावीचा निकाल लांबणार : दररोज एकच उत्तरपत्रिकेची तपासणी

प्राध्यापकांचे असहकार आंदोलन सुरू
येवला : प्रलंबित मागण्यांसाठी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर प्राध्यापकांनी बहिष्कार टाकला असून, दररोज एक उत्तरपत्रिका तपासणी केली जात आहे. एकच उत्तरपत्रिका तपासली जात असल्याने महाविद्यालयात आलेले गठ्ठे प्राचार्यांच्या कपाटात पडून आहेत. येवल्यासह जिल्ह्यातील परीक्षकांनी प्राचार्यांना निवेदन देऊन बहिष्कार आंदोलन अधिक तीव्र केले आहे.
जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने नाशिक बोर्डाचे सचिव आर.आर. मारवाडी यांना निवेदन देऊन बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीस असहकार दर्शवित आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार मागण्याची दखल न झाल्याने आंदोलन सुरू झाले असून, आत्तापर्यंत परीक्षकांना तपासणीसाठी इंग्रजी व मराठीच्या उत्तरपत्रिका आल्या आहेत. पण परीक्षक फक्त एकच उत्तरपत्रिका तपासणी करत आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांच्या अनेक मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. आॅनलाइन संच मान्यतेतील सर्व त्रूटी दूर करून प्रचलित निकषानुसार संच मान्यता करण्यात याव्यात, १ नोव्हेंबर २०१५ पूर्वीच्या अंशता अनुदानावर व अर्धवेळ सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कनिष्ठ महाविद्यालयीन प्रशासन स्वातंत्र करण्यात यावे आदि एकूण २० प्रकारच्या मागण्या आहेत. या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन देत, १५ आॅगस्ट २०१५पासून त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले होते; मात्र अद्याप आॅनलाइन संच मान्यतेतील त्रूटी दूर करण्याव्यतिरिक्त इतर कुठल्याच मागण्यांची पूर्तता झाली नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर
आहे.(वार्ताहर)