खासगीकरणातून गोदा स्वच्छतेचा घाट
By Admin | Updated: January 12, 2016 00:18 IST2016-01-12T00:17:45+5:302016-01-12T00:18:10+5:30
महासभेत प्रस्ताव : एक वर्षासाठी एक कोटीचा ठेका

खासगीकरणातून गोदा स्वच्छतेचा घाट
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणी काळात गोदावरी घाटावरील दैनंदिन स्वच्छता ठेकेदारी पद्धतीने केल्यानंतर मनपा प्रशासनाने आता त्याच पद्धतीने आनंदवली ते नांदूर मानूर पुलादरम्यानच्या गोदावरी नदीपात्र स्वच्छतेचा घाट घातला असून, मक्तेदाराला त्यासाठी एक वर्षासाठी एक कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविली आहे. सदर प्रस्ताव मंगळवारी प्रशासनाकडून ठेवला जाणार असून, ठेकेदारी पद्धतीला सदस्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे.
सिंहस्थ कुंभपर्वणी काळासाठी महापालिकेने गोदावरी घाट परिसर, तपोवन तसेच भाविक मार्गांवरील स्वच्छतेसाठी ठेकेदारी पद्धत राबविली होती. या ठेकेदारी पद्धतीलाही सदस्यांनी विरोध दर्शविला होता, तर तपोवनातील स्वच्छतेच्या ठेक्याचा वाद अजूनही न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, इतरवेळी महापालिकेमार्फत गोदावरी नदीपात्रातील पाणवेली काढण्याचे काम मजूर संस्थांना दिले जात होते. दोन-तीन लाख रुपयांच्या आतील या कामातून पाणवेली हटविली जाऊन गोदापात्र स्वच्छ ठेवले जात होते. याशिवाय, आनंदवली परिसरातील पाणवेली काढण्याचे काम स्थानिक नगरसेवक विक्रांत मते यांच्याही पुढाकाराने होत होते. गोदाघाट तसेच रामकुंड परिसरातील नदीपात्राची दैनंदिन स्वच्छता मनपा कर्मचाऱ्यांमार्फत केली जात असते. परंतु, आता उच्च न्यायालयातील दाखल जनहित याचिकेचा हवाला देत जलप्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना आवश्यक असल्याचे सांगत प्रशासनाने खासगीकरणातून गोदा स्वच्छतेचा घाट घातला आहे. त्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविली जाणार असून आनंदवली पूल ते नांदूर मानूर पुलादरम्यान असलेल्या गोदावरी नदीपात्रातील पाणवेली काढणे, तत्सम कचरा बोटींमार्फत काढणे आणि घाटाची दैनंदिन साफसफाई याकरिता एक वर्ष कालावधीसाठी सुमारे १ कोटी रुपयांचा ठेका देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. खासगीकरणाच्या या प्रस्तावाला सदस्यांकडून विरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, महापालिका कर्मचाऱ्यांमार्फतच स्वच्छता व्हावी आणि त्यासाठी सफाई कामगारांची भरतीप्रक्रिया राबवावी, अशी मागणी केली जाण्याची शक्यता आहे.