नाशिकमध्ये खासगी रुग्णालयांना परवानगी, मात्र लसच उपलब्ध नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:13 IST2021-05-23T04:13:59+5:302021-05-23T04:13:59+5:30
नाशिक : महापालिकेने शहरातील २१ खासगी रुग्णालयांना त्यांच्या मागणीनुसार लसीकरणासाठी परवानगी दिली खरी मात्र, बाजारात लसच उपलब्ध नसल्याने त्याचा ...

नाशिकमध्ये खासगी रुग्णालयांना परवानगी, मात्र लसच उपलब्ध नाही!
नाशिक : महापालिकेने शहरातील २१ खासगी रुग्णालयांना त्यांच्या मागणीनुसार लसीकरणासाठी परवानगी दिली खरी मात्र, बाजारात लसच उपलब्ध नसल्याने त्याचा गोंधळ असून लस केव्हा मिळणार असा प्रश्न आहे. शासनाकडून सुरुवातीला शासकीय, निमशासकीय आणखी खासगी रुग्णालयात लसी उपलब्ध करून दिल्या आहेत. महापालिका आणि अन्य शासकीय रुग्णालयात मोफत डोस दिले जात असले तरी खासगी रुग्णालयात अडीचशे रुपयांना एक डोस या दराने डोस दिले जात होते. मात्र, नंतर शासनाने खासगी रुग्णालयातील लसीकरण पूर्णत: बंद केले असून केवळ शासकीय रुग्णालय आणि महापालिकेच्या रुग्णालयात लस दिली जात आहे. अशा स्थितीत महापालिकेकडे खासगी रुग्णालयांनी लसीकरणाची परवानगी मागितली. त्यानुसार नाशिक महापालिकेने नाशिक पूर्व विभागात रेडीयन्ट प्लस हॉस्पिटल, साई सिध्दी हॉस्पिटल आणि सुविचार हॉस्पिटल अशा तीन ठिकाणी तर सिडकोत मयूर हॉस्पिटल, सायखेडकर हॉस्पिटल आणि सुश्रूषा क्लिनीक याठिकाणी लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. पश्चिम विभागात प्रसन्न बाल रुग्णालय, मॅग्नम हॉस्पिटल, गंगा ऋषीकेश हॉस्पिटल, साफल्य रेनबो हॉस्पिटल, नव संजीवनी हॉस्पिटल, निम्स हॉस्पिटल, मानवता कॅन्सर हॉस्पिटल,चिरंजीव हॉस्पिटल, कृष्णा मॅटर्निटी हेाम, बिर्ला आय हॉस्पिटल, अरिहंत हॉस्पिटल, अंतरा हॉस्पिटल, तुळशी हॉस्पिटल तसेच सप्तशृंगी नेत्र सेवा या रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. मात्र, अशा प्रकारची परवानगी देताना लस उपलब्धतेबाबत महापालिका जबाबदार राहाणार नाही असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी नमूद केले आहे.
मुळात महापालिकेला लस उपलब्ध होत नाही. राज्य शासनाची देखील तीच अडचण आहे. अशावेळी खासगी क्षेत्राला लस कशी मिळणार असा प्रश्न आहे. महापालिकेने परवानगी दिली असली तरी प्रत्यक्षात लस कधी उपलब्ध होईल, त्याचे दर किती असतील याची कोणतीही माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही.