पंतप्रधान मोदी यांची आज नाशकात सभा
By Admin | Updated: October 6, 2014 23:13 IST2014-10-06T23:13:21+5:302014-10-06T23:13:55+5:30
पावसाचे सावट कायम

पंतप्रधान मोदी यांची आज नाशकात सभा
नाशिक : रविवारी मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभा निवडणुकीची प्रचार सभा उद्या मंगळवारी सायंकाळी पंचवटीतील तपोवनात होत असून, त्यासाठी सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे; परंतु बदललेल्या हवामानाचा अंदाज पाहता, पावसाचे सावट या सभेवर कायम असल्याने आयोजकांनी धसका घेतला आहे. नाशिक जिल्'ातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, सायंकाळी नागपूरची सभा आटोपून विशेष विमानाने रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी ओझर विमानतळावर पोहोचणार असून, तेथून ते कारने सभास्थळी येतील. ९ वाजून ५० मिनिटांनी पुन्हा ओझरहून ते दिल्लीकडे रवाना होतील. रविवारी पावसाने सभास्थळाचे मोठे नुकसान केल्याने ते पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी केली जात असून, सोमवारीही दिवसभर ढगाळ हवामान व तुरळक पावसाच्या सरी कोसळल्याने आयोजकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला. लहरी हवामानाचा विचार करता, मंगळवारच्या सभेवरही पावसाचे सावट कायम आहे.