पंतप्रधानांकडून एक वर्षाने दखल

By Admin | Updated: April 12, 2016 00:20 IST2016-04-11T23:35:33+5:302016-04-12T00:20:05+5:30

असाही द्रुतगती कारभार : गोदावरी प्रदूषणावर आलेले उत्तरही चुकीचे

Prime Minister intervenes for one year | पंतप्रधानांकडून एक वर्षाने दखल

पंतप्रधानांकडून एक वर्षाने दखल

नाशिक : देशातील सर्व कारभार आॅनलाइन आणि डिजीटल करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातील कर्मचारी मात्र संथ कारभार करीत आहे. नाशिकच्या सनविवि फाउंडेशनच्या वतीने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कुंभमेळ्यात प्रदूषण टाळण्यासाठी केलेल्या विनंती निवेदनावर तब्बल वर्षभराने राज्य सरकारच्या अखत्यारितील प्रदूषण नियंत्रण मंडळाने पत्र पाठविले असून, गोदावरी प्रदूषण घडलेच नसल्याचा अजब दावाही केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत प्रागतिक असल्याचे त्यांच्या घोषणांवरून दिसून येते. डिजीटल इंडियापासून सर्व कामकाज आॅनलाइन करण्यापर्यंत अनेक घोषणा करत आहेत. राज्य सरकारने त्याच धर्तीवर आॅनलाइन सेवा देतानाच ‘आपलं सरकार’ नामक पोर्टलही काढले आहे, परंतु राजकीय घोषणा करीत असताना कारभाऱ्यांवर मात्र नियंत्रण नसल्याचे दिसून येते. नाशिकमध्ये सनविवि फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज बच्छाव यांना तसाच अनुभव आला. गेल्यावर्षी ४ एप्रिल रोजी कुंभमेळा तोंडावर असल्याने बच्छाव यांनी पंतप्रधान यांच्या कार्याचे कौतुक करून आणि विश्वास ठेवून पत्र पाठविले. त्यात नाशिकमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्यात गोदावरी नदीत प्रदूषण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. सदर पत्र पंतप्रधानांनी वने आणि पर्यावरण खात्याला पाठविले. त्यांनी त्याची दखल घेत खालच्या खात्यांना पत्र पाठविले. हा प्रवास २९ डिसेंबर रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळापर्यंत पोहोचला. त्यांनी त्यावर बच्छाव यांना पत्र लिहिले असून, कुंभमेळ्यात स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने गोदावरी प्रदूषण कसे टाळले याचा अहवाल पाठविला आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या परिश्रमातून पर्वणीच्या दिवशी निकषापेक्षा अधिक प्रदूषित गोदावरी नदी झाली नसल्याचा दावा केला आहे.
हे प्रदूषण मंडळाचे प्रत्युत्तर गेल्या शनिवारी म्हणजेच ९ एप्रिल रोजी टपालाने प्राप्त झाले. म्हणजे बच्छाव यांनी निवेदन ४ एप्रिल २०१५ रोजी पाठविले आणि त्याला उत्तर मिळाले ९ एप्रिल २०१६ रोजी. वर्षभराचा प्रवास आणि पुन्हा चुकीचे उत्तर यामुळे काहीही साध्य झाले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Prime Minister intervenes for one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.