प्राथमिक शाळांमध्ये होणार ‘स्वच्छ शाळा’ स्पर्धा
By Admin | Updated: November 12, 2014 23:53 IST2014-11-12T23:53:24+5:302014-11-12T23:53:46+5:30
सीईओ सुखदेव बनकरांची माहिती : तालुका व जिल्हास्तरावरून बक्षिसे

प्राथमिक शाळांमध्ये होणार ‘स्वच्छ शाळा’ स्पर्धा
नाशिक : स्वच्छ भारत अभियानांतर्गत आता पुढील टप्पा म्हणून जिल्ह्णातील सर्व ३३६६ प्राथमिक शाळांमध्ये व खासगी शाळांमध्येही ‘स्वच्छ शाळा व स्वच्छ विद्यार्थी’ स्पर्धा घेण्यात येणार असून, प्रत्येक विद्यार्थी व प्रत्येक शाळेला या स्वच्छ शाळा अभियानात सहभागी व्हावे लागणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिली.
जिल्ह्णात या स्वच्छ शाळा अभियानाचा शुभारंभ बुधवारी (दि.१२) जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात अध्यक्ष विजयश्री चुंबळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, समाजकल्याण सभापती उषा बच्छाव व मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.या अभियानासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांना जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात बोलविण्यात आले होते. केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार २ आॅक्टोबर महात्मा गांधी जयंतीपासून देशभरात स्वच्छ भारत अभियानास प्रारंभ झाला असून, त्यानुसारच स्वच्छ शाळा व स्वच्छ विद्यालय या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. १४ ते १९ नोेव्हेंबर दरम्यान प्रत्येक अंगणवाडी व शाळांमध्ये ‘बाल स्वच्छ मोहीम’ राबविण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हा परिषद स्तरावर प्रत्येक शाळेची तपासणी करण्यात येणार असून, ज्या शाळेला सर्वाधिक गुण मिळतील अशा तालुका स्तरावरील व जिल्हास्तरावरील प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील प्रत्येकी तीन शाळांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सर्वच शाळांना सहभाग घ्यावा लागणार असून ५० गुणांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या शाळांना या स्वच्छ शाळा स्पर्धेत सहभागी होता येणार असल्याचे सुखदेव बनकर यांनी सांगितले. या स्पर्धेत शाळेची व विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता तपासण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)