येवल्यात भाजपा-सेना युतीसाठी प्राथमिक बैठक
By Admin | Updated: October 22, 2016 00:00 IST2016-10-21T23:59:45+5:302016-10-22T00:00:20+5:30
पालिका निवडणूक : ज्येष्ठ नेत्याच्या घरातील गुफ्तगूमध्ये युतीचे होकारार्थी संकेत

येवल्यात भाजपा-सेना युतीसाठी प्राथमिक बैठक
येवला : येवल्यात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-सेना युती करण्यासाठी गुरुवारी येवल्यात भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या घरात गुफ्तगू झाल्याच्या वृत्ताला नगरसेवकासह सेना ज्येष्ठ नेत्यांनी दुजोरा दिला आहे. युतीचे होकारार्थी संकेत प्राथमिक बैठकीत मिळाल्याने युती झाली तर निवडणुकीत अधिकच रंग भरला जाणार आहे.
गुरुवारी दुपारच्या सुमारास भाजपा ज्येष्ठ नेते श्रीकांत गायकवाड यांच्या निवासस्थानी माजी आमदार कल्याणराव पाटील (भाजपा), जिल्हा बँक चेअरमन नरेंद्र दराडे, संभाजीराजे पवार (शिवसेना) यांच्या पुढाकाराने भाजपा-सेनेचे मुख्य नेते व काही कार्यकर्त्यांची प्राथमिक बैठक झाली. या बैठकीत युती करायची की नाही याबाबत सर्वांनी होकार भरला असला तरी, अनेक बाबी स्पष्ट व्हायच्या आहेत. पालिका निवडणुकीबाबत झालेल्या चर्चेत नेते व कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. या चर्चेत लावलेला सूर असा, विधानसभेची जागा शिवसेनेकडे, तर शहराच्या नगराध्यक्षपदाची धुरा भाजपाकडे असे सूत्र परंपरेने ठरलेले आहे. याच तत्त्वावर तत्कालीन परिस्थितीत सेनेचे आमदार कल्याणराव पाटील होते, तर सन २००१ च्या पालिका निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार सुशील गुजराथी होते. तत्कालीन परिस्थितीत भाजपाचा नगराध्यक्ष होऊ शकला नसला तरी, त्या सूत्राचा अवलंब केला तर भाजपाकडे नगराध्यक्षपदाची उमेदवारी, तर उपनगराध्यक्षपद शिवसेनेला आणि नगरसेवकांच्या अधिकच्या जागा सेनेच्या वाट्याला द्याव्यात याबाबत चर्चा झाली. परंतु याबाबत अंतिम निर्णय झाला नाही.
दरम्यान, नगराध्यक्ष निवडणूक लढवणारा उमेदवार सर्व दृष्टीने सक्षम व कोणीही असला तरी भाजपाच्या चिन्हावरच त्याची उमेदवारी असावी, अशी भूमिका कल्याणराव पाटील यांनी मांडली. आगामी दोन दिवसात पुन्हा एकदा बैठक घेऊन याबाबत विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. (वार्ताहर)