प्रतिभावंत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा गौरव
By Admin | Updated: September 17, 2016 00:45 IST2016-09-17T00:45:34+5:302016-09-17T00:45:43+5:30
अभियंता दिन : इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स नाशिक लोकल सेंटरतर्फे सन्मानपत्र

प्रतिभावंत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा गौरव
नाशिक : अमेरिका, जपान जर्मनीसारख्या जगभरातील विविध प्रगत राष्ट्रांकडून तंत्रज्ञान विकासाची घोडदौड सुरू असून या देशांमध्ये ७० ते ८० टक्के कौशल्य विकास झाला असून भारतात केवळ तीन टक्के कौशल्य विकास झाला आहे. त्यामुळे येत्या काळात देशात कौशल्य विकासासाठी मोठ्या प्रमाणात वाव असल्याचे प्रतिपादन मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी महेंद्र पाटील यांनी केले.
विभागातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील सर्व अभियांत्रिकी शाखेतील अव्वल विद्यार्थ्यांचा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्सच्या नाशिक लोकल सेंटरतर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. व्यासपीठावर आयआयएनएलचे अध्यक्ष मनीष कोठारी, सचिव सुमित खिवंसरा, सहसचिव विपुल मेहता व अजित पाटील उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे महेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना देशाच्या तंत्रज्ञान विकासात अभियंत्यांचे महत्त्व समजावून सांगताना या क्षेत्रातील विविध विषयांवर मार्गदर्शन केले. पाटील म्हणाले, मुंबईची लोकल रोज ८० लाख प्रवाशांची ने-आण करते. हे सर्व विविध शाखेतील इंजिनिअर्सच्या तंत्रज्ञानाच्या जोरावर शक्य आहे. जगातील सर्वांत उंच पूल बांधण्याचे काम भारतीय रेल्वेने चिनाब ब्रिजच्या रूपाने हाती घेतले आहे. बुलेट ट्रेन, टॅल्गो ट्रेन, बायो टॉयलेट, ई-तिकिट यासाठी तंत्रज्ञान विकास आवश्यक आहे. तंत्रज्ञान नेहमी प्रगत होत राहते. त्यामुळे भारताला येथील गरिबीसारखे प्रश्न समोर करून स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञान विकास थांबवता येणार नाही, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.