डाळ व्यापाऱ्यांची झडती सुरूच
By Admin | Updated: October 21, 2015 23:25 IST2015-10-21T23:24:39+5:302015-10-21T23:25:10+5:30
७० ठिकाणी तपासणी : प्रशासनाचे हात रिकामे

डाळ व्यापाऱ्यांची झडती सुरूच
नाशिक : तूरडाळ साठवणुकीच्या संशयावरून जिल्ह्यातील ७० व्यापाऱ्यांच्या दुकानांची व गुदामांची दुसऱ्या दिवशीही तपासणी करण्यात आली. परंतु शासनाने घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांना अन्नधान्य, डाळींच्या साठवणुकीच्या क्षमतेच्या दिलेल्या वाढीव परवान्यांमुळे प्रशासनाच्या हाती काहीही लागलेले नाही.
खुल्या बाजारात तूरडाळीचे भाव दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत भिडल्याने व्यापाऱ्यांनीच डाळींची साठवणूक करून कृत्रिम टंचाई केल्याचा शासनाला संशय असल्यामुळे मंगळवारपासून धान्य व्यापाऱ्यांची दुकाने व गुदामे तपासून क्षमतेपेक्षा जास्त डाळ साठवणूक करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील धान्य व डाळी विक्रेत्यांचे परवाने व गुदामातील शिल्लक मालाची तपासणी केली जात असून, ज्या ज्या ठिकाणी डाळ मिल आहे, त्यांचीही क्षमता तपासून वाढीव साठा आहे किंवा काय याची खात्री करण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील काही डाळ मिलचालकांची चौकशी केली असता, त्यांना शासनाने परवाना दिलेल्या प्रमाणापेक्षा अत्यल्प डाळ शिल्लक असल्याची आढळून आली आहे. जिल्ह्यात राजस्थान, मराठवाड्याकडून डाळींची आयात होते हे या तपासणीत स्पष्ट झाले; परंतु यंदा डाळींचे उत्पादन घटल्यामुळे पाहिजे तितकी डाळ घेता आली नाही, अशी खंत व्यापाऱ्यांनी बोलून दाखविली.
शहरातील काही विक्रेत्यांचे पेठरोडवरील कृउबा आवारात गुदामे असल्यामुळे या ठिकाणी डाळींचा साठा असण्याची शक्यता लक्षात घेता धान्य वितरण अधिकारी सुनील सैंदाणे, नायब तहसीलदार बिरारी यांनी कृउबातील चार व्यापाऱ्यांच्या गुदामांची तपासणी केली, त्याचबरोबर नाशिकरोड येथेही काही व्यापारी असल्याचे कळाल्यावर त्यांचाही शिल्लक साठा तपासला; परंतु त्यात काहीच आढळून आले नाही. (प्रतिनिधी)