खाद्यतेलाचा दहा रुपये कमी झालेला दर पुन्हा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:44 IST2021-02-05T05:44:26+5:302021-02-05T05:44:26+5:30
नाशिक : स्वयंपाक घरातील महत्वाचा घटक असलेले खाद्यतेल महागल्याने हा घराघरातील चिंतेचा विषय बनला आहे. जानेवारीच्या प्रारंभी असलेले ...

खाद्यतेलाचा दहा रुपये कमी झालेला दर पुन्हा वाढला
नाशिक : स्वयंपाक घरातील महत्वाचा घटक असलेले खाद्यतेल महागल्याने हा घराघरातील चिंतेचा विषय बनला आहे. जानेवारीच्या प्रारंभी असलेले खाद्यतेलाचे दर आठवडाभरापूर्वी ६ ते १० रुपये प्रतिकिलाेने घसरल्यानंतर ग्राहकांना काहीअंशी मिळालेला दिलासा औटघटकेचाच ठरला असून, खाद्यतेल पुन्हा दहा रुपयांनी महागल्याने सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
केंद्र सरकारने वाढवलेल्या आयात शुल्कामुळे खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. त्यासोबतच भारतात पामतेल निर्यात करणाऱ्या इंडाेनेशिया, मलेशिया यासारख्या देशांनीही निर्यात कर ३० टक्क्यांपर्यंत आकारण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे तेलाच्या दरामध्ये झालेली घसरण फार काळ टिकू शकली नाही. याचवेळी भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली असून, फळभाज्यांचे दर मात्र काही प्रमाणात वाढले आहेत. यात प्रामुख्याने गत आठवड्यात २४ रुपयांपर्यंत गेलेली मेथीची जुडी १४ ते १५ रुपयांपर्यंत घसरली आहे. तर टोमॅटोचा भाव प्रतिकॅरेट शंभर रुपयांनी वाढून २५० रुपयांपर्यंत गेला आहे.
कोट-
इंडोनेशियासारख्या देशाने खाद्यतेलाच्या निर्यात शुल्कात वाढ केली आहे. त्याचा थेट परिणाम तेलाच्या किमतीवर झाला असून, आयात पामतेलाच्या किमतीत वाढ झाल्याने सोयाबीन तेलाच्या मागणीत वाढ होऊन दहा रुपये प्रतिकिलोने सोयाबीन तेल महागले आहे. - शेखर दशपुते, किराणा व्यापारी.
कोट-
गेल्या आठवड्यात टोमॅटोची जाळी १२५ ते १५० रुपयाने विकली गेली. त्यामुळे उत्पादन खर्च निघणार की नाही, असा प्रश्न पडला होता. मात्र, आता टोमॅटोचे भाव जवळपास शंभर रुपयांनी वाढल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
- सागर कोकणे, शेतकरी
कोट-
तेलाचे दर काही प्रमाणात कमी झाल्याने अल्पसा दिलासा मिळाला होता. परंतु, आठवडाभरात पुन्हा तेल महागल्याने स्वयंपाकघराचे बजेट जुळवताना कसरत करावी लागणार आहे. - पूजा जाधव, गृहिणी
इन्फो-
मेथी १५ रुपये जुडी
नाशिक बाजार समिती आवारात पालेभाज्यांच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात २४ रुपये जुडी असलेली मेथी नऊ ते दहा रुपयांनी घसरली असून, मेथीला सध्या १४ ते १५ रुपये प्रतिजुडी दर मिळत आहे. तर टोमॅटो शंभर रुपयांनी वधारला असून, सध्या अडीचशे रुपये प्रतिक्रेट भाव आहे.
इन्फो-
हापूस बाजारात दाखल
नाशिकच्या फळ बाजारात हापूस आंबा दाखल झाला असून, कोकणातील राजापूर, रत्नागिरी हापूसची आवक बाजारात सुरू झाली आहे. सध्या हापूसला प्रतवारीला १६० ते २०० रुपये भाव मिळत असून, नवीन हंगामातील या हापूसची नाशिककरांना भुरळ पडत आहे.
इन्फो-
साखर घसरण सुरूच
किराणा बाजारात साखरेच्या दरात घसरण सुरूच आहे. गेल्या आठवड्यात ७५ ते ८० पैशांनी घसरलेली साखर आणखी कमी झाली आहे. जानेवारीच्या पूर्वार्धाच्या तुलनेत साखर एक ते दोन रुपयांनी घसरली आहे.
-