पितृपक्षामुळे भाजीपाला खातोय भाव; दरवाढीच्या फोडणीने स्वयंपाक घराचे नियोजन कोलमडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST2021-09-24T04:16:54+5:302021-09-24T04:16:54+5:30
नाशिक : पितृपक्ष पंधरवड्यामुळे मागणीत झालेली वाढ आणि पावसाचा जोर वाढल्याने झालेल्या नुकसानीमुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे ...

पितृपक्षामुळे भाजीपाला खातोय भाव; दरवाढीच्या फोडणीने स्वयंपाक घराचे नियोजन कोलमडले!
नाशिक : पितृपक्ष पंधरवड्यामुळे मागणीत झालेली वाढ आणि पावसाचा जोर वाढल्याने झालेल्या नुकसानीमुळे बाजारात भाजीपाल्याची आवक
घटली आहे. त्यामुळे सर्वच भाज्यांच्या दरात वाढ झाली असून महिनाभरापूर्वी दराअभावी फेकून द्यावा लागणारा भाजीपाला आता चांगलाच भाव
खातो आहे. आठ-दहा दिवसात बहुतांश भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. परिणामी गृहिणींचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
दोन आठवड्यांपूर्वी भावच नसल्याने शेतकऱ्यांना रडवणाऱ्या भाजीपाल्याचे दर आता गगणाला भिडले असून ग्राहकांवर रडण्याची वेळ आली
आहे. लहरी पावसामुळे राज्यातील अनेक भागांतील भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. तर दर नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी भाजीपाल्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी बाजारात भाज्यांची आवक अचानक घटली, त्यातच पितृपक्षामुळे मागणी वाढली. त्यामुळे बहुतांश किरकोळ सध्या किरकोळ बाजारात अनेक भाज्यांचे दर पन्नास रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत.
--------
भाजीपाल्याचे भाव (प्रतिकिलो)
भाजी -- बाजारातील दर -- घराजवळील दर
डांगर ---४०--६०
भोपळा ---२०--३०
गवार ---१००--१५०
कारली ---३०--५०
वांगी ---५०--८०
टोमॅटो ---१५--२५
बटाटे ---१४--२०
दोडके--३०--५०
भेंडी--४०--६०
घेवडा ---३०--५०
काकडी--२०--३०
मेथी जुडी--२५--४०
कोथिंबीर जुडी --२०--३०
------ गृहिणी म्हणतात -------
किरकोळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांपेक्षा कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला नक्कीच स्वस्त मिळतो. मात्र, येण्या-जाण्याचा खर्च वाढतो.
एक-दोन भाज्या खरेदीसाठी बाजार समितीत जाणे परवडत आणि शक्यही होत नाही. त्यामुळे नाईलाजाने घराजवळील बाजारातूनच भाज्या
खरेदी कराव्या लागतात.
- गयाबाई मोरे, गृहिणी
-----
पंधरा दिवसांपूर्वी भोपळा पाच रुपये नग तर टोमॅटो दहा रुपये किलो मिळत होते. दोन आठवड्यात हे दर दुप्पटीहून अधिक वाढल्याने स्वयंपाक
घराचे नियोजन कोलमडले आहे. इतर महागाई वाढली असताना आता भाज्यांचे दर देखील गगणाला भिडले असून सामान्यांनी जगायचे कसे?
असा प्रश्न आहे.
- लता जाधव, गृहिणी
------ व्यापारी म्हणतात -------
नाशिकच्या भाजीपाल्याला मुंबई, गुजरातसह इतर राज्यांतून मोठी मागणी असते. पितृपक्षामुळे त्यात आणखी वाढत झाली. मात्र, त्या तुलनेत भाजी
पाल्याची आवक होत नसल्याने दरवाढ झाली आहे. आवक पूर्ववत होईपर्यंत दरवाढ कायम राहील, असा अंदाज आहे.
- प्रसाद तांबे, व्यापारी
-----
मध्यंतरी सर्वच भाज्यांची आवक वाढल्याने भाजीपाल्याचा अक्षर: चिखल झाला होता. अनेक भाज्यांना रुपया-दोन रुपये किलो भाव मिळाला.
भाव नसल्याने अनेक शेतकºयांनी भाजीपाला पिकाकडे दुर्लक्ष केले. अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसान झाले. परिणाम आवक घटली. त्यातच पितृपक्षामुळे मागणीत वाढ झाल्याने बाजारात तेजी परतली.
- दत्ता कापसे, व्यापारी
-----
नैवेद्यामुळे मागणी
पितरांच्या नैवेद्यासाठी गवार, मेथी, कारले, डांगर आदींसह इतर भाज्यांची आवश्यकता असते. त्यामुळे तीन, चार दिवसांपासून साहजिकच या भाज्यांची मागणी वाढली आहे. पुढील दहा ते बारा दिवस ही मागणी कायम राहणार असल्याने दर चढेच राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तवला जात आहे.
----- फोटो : आर ला : २३ व्हेजिटेबल -----