कडवा कालव्यातील पाणीचोरी रोखा

By Admin | Updated: December 3, 2015 23:18 IST2015-12-03T23:18:24+5:302015-12-03T23:18:55+5:30

शेतकरी आक्रमक : डोंगळे टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा आमदारद्वयींच्या उपस्थितीत इशारा

Prevent water harvesting in the canal canal | कडवा कालव्यातील पाणीचोरी रोखा

कडवा कालव्यातील पाणीचोरी रोखा

सिन्नर : कडवा धरणातून रब्बी हंगामासाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाच्या पार्श्वभूमीवर कडवा कालव्यातून होणारी पाणीचोरी थांबवून पोटभर पाणी देण्याची मागणी अवर्षणग्रस्त सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील शेतकऱ्यांनी केली. पाणीचोरी, गळती व शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नसल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून येत होते. शेतकऱ्यांनी बैठकीत पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार करीत त्यांना चांगलेच धारेवर धरले.
येथील कडवा विश्रामगृहाच्या प्रांगणात सिन्नर, निफाड, नाशिक व इगतपुरी तालुक्यातील कालवा सल्लागार समितीची बैठक सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे व निफाडचे आमदार अनिल कदम यांच्या उपस्थितीत पार पडली. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस पंचायत समितीच्या सभापती संगीता काटे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार मनोजकुमार खैरनार, पंचायत समिती सदस्य रामदास खुळे, नवनाथ मुरडनर, विजय काटे, शिवसेनेचा तालुकाप्रमुख दीपक खुळे, कडवाचे उपअभियंता प्रशांत सगभोर, निफाडचे पंचायत समिती सदस्य सोपान खालकर, बांधकामचे उपअभियंता आर.बी. टाटिया आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कडवा धरणातून सोडण्यात आलेल्या पहिल्या आवर्तनाचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत न पोहचल्याने शेतकरी आक्रमक होतील हे गृहीत धरून या बैठकीला प्रथमच पोलीस बंदोबस्त दिसून आला. बैठकीच्या प्रारंभीच शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करीत आक्रमक पवित्रा धारण केल्याचे दिसून आले. पाटबंधारे विभागाने अचानक बैठक घेऊन पाणीवापर संस्था व शेतकऱ्यांना आमंत्रित का केले नाही या मुद्द्यावर शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. शेतकऱ्यांनी एकाच वेळी अनेक प्रश्नांचा भडिमार केल्याने बैठकीत गोंधळ निर्माण झाल्याची परिस्थिती दिसून येत होती. शेवटच्या टोकापर्यंत पाणी किती दिवसात पोहोचेल या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी हट्ट धरल्याचेही दिसून आले. पाटबंधारे खात्याचे कर्मचारी पाणी विकत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी शेतकऱ्यांनी केला.
शेतकऱ्यांचा रोष पाहून कार्यकारी अभियंता शिंदे त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पैसे घेऊन कोणी पाणी विकत असेल तर आपल्याकडे तक्रार करावी, असे त्यांनी सांगितले. रब्बीच्या सिंचनासाठी ५०३ व बिगर सिंचनासाठी २२५ असे ७२८ दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्वांना पाणी मिळावे अशी पाटबंधारे विभागाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगून शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली. पाण्याच्या मागणीचे अर्ज करा, असे आवाहन त्यांनी केले. शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पिकांची अवस्था वाईट असून, तातडीने पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाल्यानंतर १२ ते १५ डिसेंबरदरम्यान आवर्तन सोडण्यात येईल, अशी माहिती शिंदे यांनी दिली. आवर्तन सोडण्यासाठी पूर्वतयारीला वेळ लागतो असे उपअभियंता प्रशांत सगभोर यांनी सांगितले. याप्रसंगी निफाडचे शेतकरी बोलण्यास उठल्यानंतर काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.
सर्वांचे साध्य एकच असल्याने शेतकऱ्यांनी बेकीचे नव्हे तर एकीचे प्रदर्शन दाखवावे, असे आवाहन आमदार वाजे यांनी केले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला उशीर का झाले याचे कारण सांगतानाच त्यांनी यात राजकारण आणू नका अशी विनंती केली. शेतकऱ्यांनी वाद न घातला लवकरात लवकर पाणी कसे सुटेल यासाठी सहकार्य करावे तसेच शेतकऱ्यांनी स्वत:हून आपले डोंगळे काढून घ्यावे, असे आवाहन वाजे यांनी केले. वडांगळी यात्रेला पाणी कमी पडले तर प्रशासनाकडून टॅँकर उभे करून देऊ, असे आश्वासन वाजे यांनी यावेळी दिले. यावेळी वाजे यांनी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी धरणावर करण्यात आलेल्या प्रतीकात्मक आंदोलनाची माहिती दिली. यावेळी आमदार अनिल कदम यांनी एकाच आवर्तनात सर्व पाणी सोडल्यानंतर भविष्यात त्याची दाहकता जाणवेल अशी भीती व्यक्त केली. शिस्त ठेवली तरच सर्वांना पाणी मिळेल असे सांगतांना त्यांनी पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला. सर्वांना पाणी देण्याची प्रशासनाची कसोटी असल्याचेही ते म्हणाले. यावेळी पाणीवापर संस्थेच्या वतीने सतीश कोकाटे यांनी मनोगत व्यक्त करताना अडीअडचणींचा पाढा वाचतानाच गळती रोखण्याचे आवाहन केले. नको तिथे कामे करून कालव्याच्या दुरुस्तीसाठी मिळालेल्या ५३ कोटी रुपयांचा दुरुपयोग होत असल्याकडे कोकाटे यांनी लक्ष वेधले. कालवा दुरुस्तीसाठी असलेल्या जेसीबीच्या डिझेलची विक्री होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. यावेळी पंचायत समिती सदस्य रामदास खुळे, सोपान खालकर यांनी मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)

Web Title: Prevent water harvesting in the canal canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.