अवैध अतिरिक्त भाराची वाहतूक रोखा
By Admin | Updated: July 30, 2015 00:10 IST2015-07-30T00:04:34+5:302015-07-30T00:10:27+5:30
नितीन गडकरींना निवेदन : आरटीओची भूमिका बघ्याची

अवैध अतिरिक्त भाराची वाहतूक रोखा
नाशिक : जिल्ह्यात वाळू,खडी, मुरूम, विटा व माती आदि बिंिल्ंडग मटेरियलची अवैध ओव्हरलोड वाहतूक दिवस-रात्र सुरू असून ती त्वरित थांबविण्यात यावी, तसेच ओव्हरलोड वाहतुकीच्या तक्रारींसंदर्भात शासनाने संकेतस्थळ सुरू करावे,अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांना नाशिक जिल्हा वाळू, विटा, मुरूम, माती, खडी व दगड वाहतूकदार संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह परिवहन आयुक्त, विभागीय महसुल आयुक्त, जिल्हाधिकारी यांनाही दिल्या आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात बिल्ंिडग मटेरियलची अवैध ओव्हरलोड वाहतूक दिवस-रात्र सुरू आहे. जिल्हा परिवहन विभागाचे अधिकारी कारवाई करीत नाही. इतकेच नव्हे तर मुंबई-पुणे आदि जिल्ह्यातून येणारे परिवहन विभागाचे भरारी पथकसुद्धा जिल्ह्यातील अवैध ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई करीत नाही. या वाहतुकीमुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते खराब झाले आहेत.
काही ठिकाणी सिंहस्थांसाठी नव्याने तयार केलेले डांबरी रस्तेही एकाच महिन्यात उखडले आहेत. तसेच अपघातांच्या संख्येतसुद्धा वाढ झाली आहे. जिल्ह्यातील रस्त्यांचे नुकसान, जीवितहानी व आर्थिक नुकसान या वाहतुकीमुळे होत आहे. तरी या अवैध वाहतुकीला परिवहन विभागाने त्वरित आळा घालावा तसेच संबंधित ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
निवेदनावर जयंत आव्हाड, गजानन नवले, शरद फडोळ, उमाकांत काकड, धीरज भंडारी, अभिजित बनकर, चेतन शुक्ला, शरद नवले, सचिन वर्मा, शांताराम जाधव, संजय मोजा, राजेश पाटा, श्रीकांत भुसाळ, अमित पटेल यांच्यासह ४३ वाहतूकदारांनी केली आहे. (प्रतिनिधी)