माघारीसाठी दबाव अन् मनधरणीही
By Admin | Updated: February 7, 2017 22:51 IST2017-02-07T22:51:20+5:302017-02-07T22:51:44+5:30
अखेरचा दिवस गाजला : अडचणीच्या ठरणाऱ्या उमेदवाराला केले पाचारण

माघारीसाठी दबाव अन् मनधरणीही
नाशिक : प्रतिस्पर्ध्यांवर असलेले लक्ष, क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा व टळत जाणारी वेळ असे चित्र मंगळवारी नाशिक शहरातील सहाही विभागीय कार्यालयांबाहेर पाहण्यात आले. काहींनी थेट मनधरणी करीत अडचणीच्या ठरणाऱ्या उमेदवाराला मानसन्मानाने माघारीसाठी पाचरण केले, तर काहींनी धाकदपडशा दाखवून माघार घेण्यास भाग पाडले. निवडणुकीत संधी करून घेण्यासाठी अर्ज दाखल केलेल्यांनी तर पडद्याआड आर्थिक तडजोड करून घेतल्याच्याही खमंग चर्चाही चर्चिल्या गेल्या.
महापालिका निवडणुकीची नुसती चर्चा सुरू झाल्यापासूनच इच्छुकांना घुमारे फुटून आपल्याला सोयीच्या ठरणाऱ्या प्रभागाची शोधाशोध तर केलीच, परंतु प्रत्यक्ष प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर पॅनलमध्ये कोण असावे आणि कोण नसावे याचाही अंदाज बांधला. राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळण्यासाठी उंबरठे झिजविण्याबरोबरच पक्षांतराचा पर्यायही खुला ठेवला. अशा प्रकारचा सर्व खटाटोप करून उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांसाठी आता प्रतिस्पर्र्धीदेखील नकोसे वाटू लागल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यापासून माघारीसाठी प्रयत्न केले जात होते, त्याची झलक मंगळवारी सकाळी अकरा वाजेपासून सर्वत्र दिसली. महापालिका निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी दिलेल्यांबरोबरच अपक्ष व आघाडी करून रिंगणात उभे असलेल्यांमुळे एकेका गटात सहा ते सात उमेदवार रिंगणात शिल्लक असल्यामुळे विजयाचे गणित बिघडण्याची भीती अनेकांना वाटू लागली, त्यामुळे शक्यतो अपक्ष व आघाडी केलेल्यांना माघार घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले.
प्रतिस्पर्ध्याला फोडला घाम
काहींवर सामाजिक, जातीय दबाव टाकण्यात आला, तर काहींना शेवटची संधी आहे, पुढची संधी तुम्हाला, असे आश्वासन देऊन मनधरणी करण्यात आली. काही चाणाक्ष उमेदवार या साऱ्या प्रकारांपासून परिचित असल्याने भूमिगत झाले असता, त्यांच्या शोधासाठी वणवण करावी लागली. कसेबसे हाती लागलेल्यांना मानसन्मान देऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत आणण्यात आले. काही बाहुबलींनी तर थेट ‘पाहून घेऊ’ अशी दमबाजी करून प्रतिस्पर्ध्याला घाम फोडला. माघार घेण्यासाठी दुपारी तीन वाजेची अंतिम मुदत असल्यामुळे दुपारी बारा वाजेपासूनच प्रमुख उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर तळ ठोकला होता. त्यामुळे प्रत्येक प्रभागातून कोण माघार घेतो याकडे राजकीय पक्षांचे पदाधिकारीही लक्ष ठेवून होते. माघारीच्या दिवशी हाणामारी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता.