पदवीधरांच्या छायाचित्रांसाठी प्रांताधिकारी सरसावले
By Admin | Updated: July 30, 2016 01:06 IST2016-07-30T01:05:38+5:302016-07-30T01:06:22+5:30
जबाबदारीचे वाटप : बीएलओंनाही पिटाळले

पदवीधरांच्या छायाचित्रांसाठी प्रांताधिकारी सरसावले
नाशिक : नाशिकमधील पदवीधरांचे छायाचित्र गोळा करताना तहसील कार्यालयाची होत असलेली दमछाक पाहता, आता हेच काम शहरातील चारही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांना वाटून देण्यात आले असून, छायाचित्र गोळा करण्याची पद्धती व कर्मचारी तेच असल्याने या नवीन जबाबदारीतून काय निष्पन्न होते, त्याकडे लक्ष लागून आहे.
जिल्ह्यातील पदवीधर मतदारांची यादी छायांकित करण्यासाठी त्यांचे छायाचित्र आवश्यक असल्याने निवडणूक आयोगाने ते गोळा करण्याचे आदेश निवडणूक शाखेला दिले आहेत. त्यानुसार गेल्या दीड महिन्यापासून विविध माध्यमांतून छायाचित्र गोळा करण्याचे काम केले जात आहे, परंतु त्याला पाहिजे तितका प्रतिसाद मिळत नसल्याने नाशिक तालुक्यात जेमतेम १५ टक्केच छायाचित्र गोळा होऊ शकले आहेत. मतदार यादीतील मतदारांचे पत्ते परिपूर्ण नसल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याने त्यावर तोडगा म्हणून पदवीधर मतदारांच्या नावावरून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे.
गुरुवारी दुपारी या अधिकाऱ्यांनी पदवीधर मतदारसंघासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांची तसेच त्यांना सहायक म्हणून त्या त्या मतदारसंघातील केंद्रीयस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची संयुक्त बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. ज्या मतदारांचे पत्ते सापडत नाहीत, त्यांचा नावावरून शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन खात्री करण्याचे तसेच निवडणूक ओळखपत्रावरून शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या, दिवसातून एकेका कर्मचाऱ्याने किमान वीस पदवीधरांचा शोध घेण्याचे टार्गेटही देण्यात आले आहे.
आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवरच जबाबदारी सोपविण्यात आल्याने किती पदवीधर हाती लागतात, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)