उपक्रमशीलतेला लाभले राष्ट्रपती पुरस्काराचे कोंदण !
By Admin | Updated: September 4, 2015 21:59 IST2015-09-04T21:59:09+5:302015-09-04T21:59:55+5:30
शिक्षक दिन विशेष : शाळेतील दोन अनाथ मुलांना दत्तक घेऊन केले दहावीपर्यंतचे शिक्षण

उपक्रमशीलतेला लाभले राष्ट्रपती पुरस्काराचे कोंदण !
शरद नेरकर, नामपूर
प्रामाणिकपणे व निष्ठेने ज्ञानदान करणे हे प्रत्येक शिक्षकाचे आद्यकर्तव्य. परंतु हे कर्तव्य पार पाडीत असताना स्वत: जन्मजात अपंगत्वाचे दु:ख बाजूला सारून विद्यार्थ्यांप्रति ममत्वाची भावनाही हृदयाच्या कप्प्यात जपतो आणि आपल्याला मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून अपंग मुलांना हातभार लावताना सेवाभावही जोपासतो. तसेच आपल्याच शाळेतील दोन अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारतो, असा शिक्षक विरळच असतो.
सोपान गोकुळराव खैरनार. बागलाण तालुक्यातील अंतापूर येथील रहिवाशी. १९८८ मध्ये ज्ञानदानाचे व्रत स्वीकारलेल्या खैरनार यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी निबंध, चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले. स्वत: हार्मोनियम व तबलावादक असल्याने त्यांच्याच प्रयत्नातून पूर्वीच्या जुनी बेज व सध्याच्या मोरेनगर शाळेत संगीतमय परिपाठ घेण्याची सवय लावली. सुंदर हस्ताक्षरासाठी सुलेखन पुस्तिकेची निर्मिती व राज्यातील पहिली ऑनलाइन शाळेचा मान जुनी बेजच्या शाळेला मिळवून दिल्याने यूएसएच्या तज्ज्ञांनी त्यांना शाबासकीची थाप दिली. मोरेनगरच्या शाळेत स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी खैरनार यांनी ‘स्कॉलर
मंत्रा’ नावाचे सॉफ्टवेअर बनविले असून, आदर्श शाळांना त्यांनी ते भेट म्हणूनही दिले आहेत.
बलिधर्म चॅरिटेबल ट्रस्टकडून मिळालेल्या पुरस्काराची ५0 हजार रुपयांची रक्कम अपंग मुलांसाठी दिली तर तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळालेल्या पुरस्काराची दहा हजार रुपयांची रक्कम दोन अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणावर खर्च केली. खैरनार यांचा ‘बिनदप्तराची शाळा’ हा शैक्षणिक उपक्रम राज्यभर गाजला. तसेच ‘फन फेअर ऑफ मोरेनगर’ या उपक्रमातून मोरेनगर शाळेतील विद्यार्थ्यांना संशोधक बनण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवून पारितोषिके पटकावली आहेत. त्यांच्या योगदानामुळेच त्यांना आज राष्ट्रपती पुरस्काराने गौरविले जात आहे.
पुरस्कार खूप मिळालेत; पण स्वप्नातला राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याने खूपच आनंद झाला. विद्यार्थी हे दैवत आणि अध्यापन हे कर्तव्य मानून अनेक पिढय़ा घडवल्या. ठरवले असते तर मोठा अधिकारीही होऊ शकलो असतो, परंतु विद्यार्थी घडविण्यात जो आनंद आहे, त्यापेक्षा मोठा आनंद कशातच नाही.
- सोपान खैरनार, शिक्षक, सटाणा