अध्यक्ष म्हणतात, बिघडले काय?
By Admin | Updated: October 11, 2015 21:38 IST2015-10-11T21:37:35+5:302015-10-11T21:38:00+5:30
कुसुमाग्रज प्रतिष्ठान : घटनेतील दहा वर्षे मुदतीचे कलम वगळण्यासाठी आटापिटा

अध्यक्ष म्हणतात, बिघडले काय?
नाशिक : गेल्या पंचवीस वर्षांत कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये एका पैशाचा गैरव्यवहार झालेला नाही. मग प्रतिष्ठानचे विश्वस्त वर्षानुवर्षे पदावर राहिले तर बिघडले कोठे, असा सवाल प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला. अध्यक्षांच्या याच पवित्र्यामुळे ठराविक विश्वस्तांना प्रतिष्ठानमध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडण्याचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, प्रतिष्ठानच्या घटनादुरुस्तीचा प्रस्ताव धर्मादाय आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष व विश्वस्तांनी सध्या प्रतिष्ठानच्या घटनेत दुरुस्ती करण्याचा घाट घातला असून, या पार्श्वभूमीवर कर्णिक यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी या प्रक्रियेचे समर्थनच केले. प्रतिष्ठानची घटना स्वत: कुसुमाग्रजांनी तयार करवून घेतली असून, या घटनेच्या आठव्या कलमात प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदाचा कार्यकाळ पाच वर्षे असा निश्चित करण्यात आला आहे. हा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला पुन्हा पाच वर्षांसाठी मुदतवाढ देता येते; मात्र एका व्यक्तीने दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर तिला विश्वस्तपदावर राहता येत नाही. प्रतिष्ठानवर ठराविक व्यक्तींनी वर्षानुवर्षे ठाण मांडून राहू नये, नव्या व्यक्तींनाही कामाची संधी मिळावी, असा दूरगामी विचार करून तात्यासाहेबांनी घटनेत या कलमाचा अंतर्भाव केला होता; मात्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष व विश्वस्तांनी या कलमात दुरुस्तीचा निर्णय घेत कुसुमाग्रजांच्या मूळ हेतूलाच नख लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या कलमातील दहा वर्षे मुदतीची अट वगळण्याचा ठराव विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला असून, त्यानुसार धर्मादाय आयुक्तांकडे दुरुस्तीचा प्रस्तावही पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे.
प्रतिष्ठानच्या घटनेत ‘कोणत्याही विश्वस्ताची मुदत एकूण दहा वर्षांपेक्षा अधिक असणार नाही’, असा स्पष्ट उल्लेख कुसुमाग्रजांनी केला आहे. त्यामागे त्यांचा ठोस विचार होता; मात्र या प्रक्रियेद्वारे त्या विचारालाच तिलांजली देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दुरुस्तीमुळे ठराविक व्यक्तींना वर्षानुवर्षे विश्वस्तपदावर ठाण मांडून राहता येणार असून, नव्या व्यक्तींचा प्रतिष्ठानमधील प्रवेश दुर्लभ होण्याची भीती सांस्कृतिक वर्तुळातून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
ही काही सोसायटी नाही...या घटनादुरुस्तीतून कुसुमाग्रजांच्या मूळ हेतू वा विचारांना धक्का लावण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही. वेळोवेळी गरजेनुसार घटनेत दुरुस्ती व्हावी, अशीच त्यांची भूमिका होती. हे कुसुमाग्रज प्रतिष्ठान आहे, एखादी सोसायटी नाही, की जिचे संचालक दर तीन वर्षांनी बदलावेत. प्रतिष्ठानची निर्णयप्रक्रिया दीर्घकालीन असते. तिच्यात सातत्य राहावे, यासाठी ही दुरुस्ती केली जात आहे. यासंदर्भातील ठराव विश्वस्तांच्या बैठकीत मंजूर झालेला आहे. यात बेकायदेशीर काहीही नाही. सगळे विश्वस्त खाऊन-पिऊन सुखी आहेत. प्रतिष्ठानमध्ये गेल्या २५ वर्षांत एका पैशाचा गैरव्यवहार झालेला नाही. मग हे विश्वस्त वर्षानुवर्षे पदावर राहिले तर बिघडले काय?
- मधु मंगेश कर्णिक, अध्यक्ष, प्रतिष्ठान