फेरनियोजनाची तयारी सुरू

By Admin | Updated: September 5, 2015 00:36 IST2015-09-05T00:36:02+5:302015-09-05T00:36:08+5:30

सिंहस्थ कुंभमेळा : तातडीच्या बैठकीत सज्जतेच्या सूचना

Preparing for the rearrangement | फेरनियोजनाची तयारी सुरू

फेरनियोजनाची तयारी सुरू

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीसाठी येणाऱ्या अधिकाधिक भाविकांना लक्ष्मीनारायण घाटापर्यंत स्नानासाठी येऊ देण्याच्या करण्यात आलेल्या फेरनियोजनानुसार मूलभूत सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने शुक्रवारी कुंभमेळ्याची तातडीची बैठक विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गुरुवारी फेरनियोजनाची बैठक झाल्यानंतर त्यात घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी बैठक घेतली. त्यात नाशिकरोडकडून येणारे तसेच मुंबई, धुळे, दिंडोरी, त्र्यंबककडून येणारे भाविक लक्ष्मीनारायण घाटावर स्नानासाठी येणार असल्याने त्यांची वाहतूक तसेच घाटावर अन्य सुविधा देण्याबाबत विचार करण्यात आला. क्षमतेपेक्षा जास्त भाविक याठिकाणी आल्यास त्यांना दसक व टाकळी घाटावर कसे नेता येईल याबाबतही चर्चा करण्यात आली. या ठिकाणी अधिक भाविक येणार असल्यामुळे वैद्यकीय सुविधा तसेच जलतरणपटूंची संख्या वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या.
सेक्टर अधिकाऱ्यांनीही या नवीन बदलाची दखल घेऊन आपल्या हाताखालील अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांपर्यंत या सूचना पोहोचवाव्यात त्याचबरोबर लक्ष्मीनारायण घाटाच्या मार्गावर शौचालय, मुतारींची संख्या वाढविण्याचे ठरविण्यात आले. शहरांतर्गत करण्यात येणाऱ्या पार्किंगच्या प्रश्नावरही यावेळी चर्चा झाली. इदगाह मैदानावरून त्र्यंबकेश्वरसाठी बसेस सोडण्यात येणार असल्याने काही जागा बससाठी तर काही दुचाकी पार्किंगसाठी राखून ठेवता येईल काय यावरही चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Preparing for the rearrangement