म्हाळोबा यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: February 7, 2017 23:53 IST2017-02-07T23:53:13+5:302017-02-07T23:53:31+5:30
दोडी येथे उद्यापासून यात्रा : शुक्रवारी मुखवट्याचे पूजन, राज्यभरातील भाविक येणार

म्हाळोबा यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात
नांदूरशिंगोटे : धनगर समाजाचे कुलदैवत व सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक परिसरातील जागृत देवस्थान असलेल्या श्री म्हाळोबा महाराज यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गुरुवार (दि. ९) पासून यात्रेस प्रारंभ होत आहे.
श्री म्हाळोबा महाराज यात्रा समितीची नुकतीच बैठक होऊन उत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेला म्हाळोबा महाराज यात्रोत्सवाला प्रारंभ होतो. बोकडबळीमुळे राज्यभर ही यात्रा ओळखली जाते. म्हाळोबा महाराजांना मानणाऱ्या भाविकांची मोठी संख्या आहे. गेल्या पाच वर्षांपासून मंदिराचे लोकवर्गणीतून जीर्णोद्धाराचे काम सुरू होते. सदर काम पूर्ण झाले आहे. मंदिराच्या सभामंडपात आकर्षक मार्बल्स बसविण्यात आली असून, लांबी वाढविण्यात आली आहे. यामुळे म्हाळोबा महाराजांचे मंदिर आकर्षकरीत्या सजले आहे. यात्रेव्यतिरिक्तही वर्षभर म्हाळोबा महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. तीन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवासाठी मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. मंदिरास रंगरंगोटी करण्यात आली असून, मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तीन दिवसीय यात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेसाठी राज्यातून लाखो भाविक हजेरी लावून नवसपूर्तीसाठी बोकडबळी देत असतात. बुधवारी रात्री भाविक गंगेचे पाणी आणून गुुरुवारी पहाटे म्हाळोबा महाराजांना अभ्यंगस्नान घालणार आहेत. गुरुवारी सकाळी देवाच्या मुखवट्याची व पालखीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत रंगीबेरंगी काठीमहाल सजवून धनगरी ढोल व व्हलाराच्या सनईवाद्यात निघणारी मिरवणूक आकर्षक ठरणार आहे. यावेळी भक्तगण धनगर गजनृत्य सादर करून काठीमहाल नाचवित नेणार आहे. महिलांच्या हस्ते देवाची व काठीमहालाची पूजा करतात. त्यानंतर मुखवटा स्थापना करण्यात येणार आहे. गुुरुवारी सायंकाळी स्थानिक भगत असणारे शिंदे मंडळी नवसाचे बोकडबळी देतील. शुक्रवारी सकाळी माघ पौर्णिमेच्या दिवशी गादीचे व मुखवट्याचे पूजन केले जाणार आहे. दिवसभर मंदिरात होमहवन, आरती व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. वर्षभर म्हाळोबा महाराजांना जे भाविक नवस कबूल करतात ते बोकडबळीसाठी येथे येतात. यादिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी व बोकडबळी दिले जातात. नवसपूर्तीसाठी महिला गळ खेळणे व लोटांगण घेणे आदि कार्यक्रम करतात. तळेगाव येथील भक्तगणांना गादीच्या देवाचा व काठीचा मान दिला जातो. राज्यभरातून येथे काठ्या येतात. पाऊल टेकडीपासून मंदिरापर्यंत काठीची देवास भेट घडविली जाते. त्यानंतर रात्रभर भगत मंडळी डफाच्या तालावर देवाची गाणी म्हणतात. शनिवारी दुपारी तीन वाजता नामवंत मल्लांची कुस्त्यांची दंगल होणार आहे. यात विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातात. यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारची दुकाने दाखल होण्यास सुुरुवात झाली आहे. यात्रोत्सव पार पाडण्यासाठी समितीचे पाराजी शिंदे, भारत शिंदे, बाळासाहेब शिंदे, मारुती शिंदे, कारभारी शिंदे, भारत शिंदे, कचरू शिंदे, रतन शिंदे, जानकू शिंदे, रभाजी जाधव, साहेबराव शिंदे, शिवाजी शिंदे, रायभान शिंदे, काशीनाथ शिंदे, मल्हारी शिंदे, सुभाष शिंदे, चंद्रभान जाधव, किसन शिंदे, बापू शिंदे, माधव शिंदे आदिंसह यात्रोत्सव समितीचे सदस्य प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)