फेरीवाला क्षेत्राचा प्रस्ताव तयार

By Admin | Updated: July 22, 2014 00:51 IST2014-07-22T00:37:14+5:302014-07-22T00:51:44+5:30

फेरीवाला क्षेत्राचा प्रस्ताव तयार

Prepare the proposal for the hawker area | फेरीवाला क्षेत्राचा प्रस्ताव तयार

फेरीवाला क्षेत्राचा प्रस्ताव तयार

 

नाशिक : शहरात फेरीवाला क्षेत्र तयार करण्यासाठी महापालिकेतर्फे ३७ जागांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यात आणखी क्षेत्र वाढविले जाणार आहे. त्याचप्रमाणे अधिक व्यवसायाचे क्षेत्र तसेच कमी व्यवसायाचे क्षेत्र अशी विगतवारी करण्यात येणार असून, त्या नुसार फेरीवाल्यांकडून कर आकारणी केली जाणार आहे.
पालिकेने शहर फेरीवाला समितीची स्थापना केली असून, या समितीची बैठक उपआयुक्त दत्तात्रेय गोतिसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. महापालिकेने शहराच्या विविध भागात फेरीवाला क्षेत्रासाठी ३७ जागा निवडल्या असून, त्याचा प्रस्ताव या समितीवर मांडण्यात आला. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे अनेक भागांत वसाहती होत असून, त्यानुसार क्षेत्र वाढविण्याची मागणी केली. सदस्यांनी विविध जागा सुचविल्या तथापि, प्रस्तावित जागांची माहिती प्रभाग फेरीवाला समितीकडे पाठविण्यात येणार असून, त्यांच्या सूचनेनुसार आणखी जागा वाढविण्यात येणार आहे. फेरीवाला क्षेत्रासाठी जागा निश्चित झाल्यानंतर क्षेत्रनिहाय फेरीवाल्यांकडून आकारणी केली जाणार आहे. सध्या सीबीएस येथे एका हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्याला दिवसाकाठी एक हजार रुपये मिळत असेल आणि आनंदवल्ली येथे एका विक्रेत्याला दिवसाकाठी दोनशे रुपये मिळत असतील तर आता त्याठिकाणी मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत कर आकारणी केली जाणार आहे. अ क्षेत्रात दोनशे रुपये तर ड क्षेत्रात अवघे २५ रुपये असे टप्प्याटप्प्याने आकारण्याचा प्रस्ताव आहे तसेच फेरीवाला नोंदणीसाठी पुण्यात पाचशे रुपये नोंदणी शुल्क आकारले जाते नाशिकमध्ये ते तीनशे रुपये इतके आकारावे, अशी मागणी करण्यात आली. अशाच प्रकारे शासकीय दुग्ध विक्रेते, गटई कामगार तसेच अंपगांकडून जागा भाडे अल्पदरात आकारण्याची शासनाची तरतूद असून, त्यानुसार अन्य व्यावसायिकांच्या तुलनेत ५० टक्के कर आकारण्याच्या तरतुदीची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. फेरीवाल्यांना अल्पदरात घरे उपलब्ध करून द्यावी तसेच राजीव आवास योजनेचा लाभ द्यावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. आॅगस्ट महिन्यात पुढील बैठक होणार आहे. आज झालेल्या बैठकीत दत्तात्रेय तळेकर, दिनेश जाधव, युनूस सय्यद, पुष्पाबाई वानखेडे, प्रकाश अहेर, संदीप भंवर, राजेंद्र दिंडोरकर, नवनाथ ढगे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Prepare the proposal for the hawker area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.