दुसऱ्या शाहीस्रानासाठी आखाडे सज्ज
By Admin | Updated: September 12, 2015 22:44 IST2015-09-12T22:43:28+5:302015-09-12T22:44:19+5:30
त्र्यंबकेश्वर : निरंजनी, आनंद आखाड्याला पहिला मान

दुसऱ्या शाहीस्रानासाठी आखाडे सज्ज
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिली पर्वणी उत्साहात आणि शांततेत पार पडल्यानंतर आता आखाडे, प्रशासन आणि भाविकांना दुसऱ्या पर्वणीचे वेध लागले आहेत. आखाडे आणि प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून हजारो वर्षांच्या परंपरेनुसारच शाहीस्नान विधिवत, सवाद्य मिरवणुकीने पार पडणार
आहे.
दुसऱ्या पर्वणीत पहाटे ३.४० मिनिटांनी कुशावर्तात प्रथम शाहीस्नान करण्याचा मान निरंजनी आणि आनंद आखाड्याला देण्यात येणार असून त्यानंतर जुना आखाडा, आवाहन, अटल, अग्नी, महानिर्वाणी, बडा उदासीन, नया उदासीन व निर्मल आखाड्यांचे स्नान होणार आहे.
प्रशासनाच्या विनंतीनुसार सर्व आखाड्यांनी ट्रॅक्टरची संख्या कमी करण्याचे निश्चित केले असून मागणी करुनही शाही स्नानाची वेळ वाढवून न दिल्याने निर्धारित वेळेतच स्नान पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे,
आखाड्यांच्या सुचनेनुसार शाहीस्नानादरम्यान कुशावर्तावरील अतिरिक्त पोलिस बंदोबस्त काढून घेण्यात येणार असून साधू-संत-महंत भाविकांना शांततेने व विधीवत स्नान करताना कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. आखाडे, ग्रामस्थ आणि भाविकांच्या व देशरातून आलेल्या भाविकांना कुंभमेळ्यातील शाहीस्नानांचा मिरवणुकांचा आस्वाद घेउ दिला जाणार आहे.
येथील सर्व दहाही आखाड्यांचे शाहीस्नान झाल्यानंतर दुपारी १२ वाजेनंतरच भाविकांना कुशावर्त कुंड स्नानासाठी खुले करुन देण्यात येणार असून तोपर्यंत कुणीही स्नानाल जाण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)
पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन
त्र्यंबकेश्वर : श्रावण वद्य ३०, शनि आमावस्याच्या पूर्व संध्येला व वामनद्वादशीच्या मुख्यशाही पर्वासाठी त्र्यंबक नगरी सज्ज झाली असून त्र्यंबकमधील सर्वच्या सर्व अखाड्यांमध्ये शृंगारलेले ट्रॅक्टर सज्जे झाले आहेत. शाही स्नानाच्या पूर्व संध्येला साधु-महात्म्यांची तयारी सुरु असून पालिकेने रात्रंदिवस स्वच्छतेची कामे पूर्ण केली आहे तसेच जंतूनाशक फवारणी केली आहे.
पोलिसांनी बंदोबस्तात शिथीलता आणली असून जनतेनेही पोलीसांना सहकार्य करावे. असे आवाहन प्रशासनाने केले आहे. संपूर्ण शहर व परिसर गर्दीने फुलून गेला आहे. पोलिसांनी परवानगी दिल्याने आता भाविकांची पायपीट थांबली आहे. नाशिक ते खंबाळे व खंबाळे ते त्र्यंबकेश्वर जव्हार फाटा अशी बस सेवा आहे.
खासगी वाहने असल्यास सर्व वाहने खंबाळे, पाहेणे, अंबोली आदी ठिकाणी थांबवली जाऊन वाहनतळावरुन थेट त्र्यंबकेश्वरजव्हार फाटा स्टँडवर उतरविले जात आहे. त्यामुळे भाविकांचा ओघ शहरात घुसत आहेत. दरम्यान मंदिरात दर्शनार्थींची रांग पूर्व दरवाजातून थेट उदासिन नया अखाड्या (अहिल्या डॅम) पर्यंत लागली आहे. त्यामुळे स्नानिकांना दर्शनास मनाई करण्यात आली आहे. स्थानिकांना दर्शन करायचे असेल तर त्यांनी रांगेतून दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वामी स्वरुपानंद सरस्वती शंकराचार्य पहाटे ३ वाजता तर द्वारकाशारदा १ ज्योतिपीठाचे शंकराचार्य पहाटे ३.00 वाजता स्नान करणार आहे. नेहमीच्या वेळेप्रमाणे पहाटे ४.१५ वाजेपासून गावातील सर्व अखाड्यांचे शाही स्नान सुरु होणार आहे.